ना. सामंत; पन्नास एकर जागेचे होणार अधिग्रहण
रत्नागिरी:- सागरी विद्यापीठासाठी नेमलेल्या एक सदस्यीय समितीने अभ्यास अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. रत्नागिरीत होणारे राज्यातील पहिले सागरी विद्यापिठ असून त्यासाठी पन्नास एकर जागेचे अधिग्रहण लवकरच करण्यात येणार आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
अल्पचबचत कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्याला 720 किमीचा सागरी किनारा लाभला असून त्याचा सर्वंकष अभ्यास होणे आवश्यक आहे. सागरी संपन्नतेचा अभ्यास त्यामुळे होऊ शकेल. त्याचा फायदा राज्यातील मच्छिमारांना व व्यावसायिकांनाही होणार आहे. सागरी विद्यापीठ उभारण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दिला असून त्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. विद्यापीठ स्थापन करण्यापुर्वी अभ्यास करण्यासाठी डॉ. सारंग कुलकर्णी यांची एक सदस्य समिती नेमण्यात आली होती. कुलकर्णी यांनी अभ्यास अहवाल सादर केला आहे. मच्छीविषयक नव्याने उद्योग सुरु करणार्यांसाठी विचार करण्यात आला आहे. त्याचा स्थानिक विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा होईल.
चिपळूण येथे सुरु असलेल्या आंदोलनाविषयी बोलताना ते म्हणाले, आंदोलकांचा गैरसमज करुन देण्यात आला आहे. वशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी उमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिझेल खर्चासाठी 9 कोटी 50 लाख मंजूर केले आहेत. नवीन मशिन खरेदीसाठी 15 कोटी रुपयेही मिळणार आहेत. तसेच 48 पैकी 18 गाळाची बेटं काढण्यात येणार असून त्यामुळे काही प्रमाणात पुराचा प्रश्न सुटू शकेल.