रत्नागिरी:- शहरातील एका प्रसिद्ध खाजगी रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या नर्सने आरोग्य मंदिर येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तरुणीने आत्महत्या करण्याची तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हर्दिका नारायण मिरगुले (२२, रा. जैतापूर मिरगुलेवाडी, सध्या रा. आरोग्यमंदीर) ही शहरातील एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून सेवेत आहे. शिक्षण घेताना ती पार्ट टाइम जॉब करते . नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या अन्य सहा मुली तिच्या समवेत आरोग्य मंदिर येथे भाड्याचा फ्लॅट घेऊन राहत होत्या. एकूण सात मुलींपैकी तीन मुली सुट्टी असल्याने आपल्या गावी गेल्या होत्या. तर हर्दिका व अन्य तीन मुली फ्लॅटमध्ये राहिला होत्या. सोमवारी रात्री हर्दिकाची नाईट शिफ्ट असल्याने ती हॉस्पिटलमध्ये गेली होती. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हर्दिका हॉस्पिटल मधून फ्लॅटवर येत असताना रूम मधील तीन मुली हॉस्पिटलला जायला निघाल्या होत्या. रस्त्यात त्यांची भेट झाली. त्यानंतर हर्दिका फ्लॅटवर आली होती.
सायंकाळच्या सुमारास नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी रुग्णालयात आलेल्या तीन मुली पुन्हा फ्लॅटवर गेल्या. त्यावेळी फ्लॅट आतून बंद असल्याने त्यांनी आजूबाजूच्या शेजाऱ्यांना याची कल्पना दिली. सर्वांनी दरवाजा तोडला व आत प्रवेश केला. यावेळी फ्लॅटच्या बेडरूम मध्ये पंख्याला गळफास लावल्याच्या स्थितीतील मृतदेह त्यांना आढळून आला. यानंतर सर्वांचीच तारांबळ उडाली. घटनेची माहिती मिळतच शहर पोलिस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.
दोन दिवसापूर्वी रुग्णालयातील स्नेहसंमेलनात सक्रिय झालेल्या हर्दिकाने अचानक आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. स्नेहसंमेलनातील फोटो तिने आपल्या आई वडिलांनाही पाठविले होते. त्यानंतर दोन दिवसात असे काय घडले कि हर्दिकाला आत्महत्या करावी लागली. हर्दिका हि मेहनती मुलगी होती. ती राहत असलेल्या इमारतीमध्ये हि सर्वाना परिचीत होती.