रत्नागिरी:- प्रशासकिय राजवट असलेल्या रत्नागिरी पालिका प्रशासनाने नागरिकांना आवश्यक दाखले, उतारेच्या शुल्कात दुप्पटीने वाढ केली आहे. त्यामुळे आता रत्नागिरीकरांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.पालिकेचा ठराव केल्यानंतर आता जाहिर सुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी हरकत न घेतल्यास १ जानेवारी २०२३ पासून नव्या दाराची अंमलबजावणी होणार आहे. सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने आता दरवाढीला विरोध करायचा झाल्यास नागरिकांनाच रस्त्यावर उतरावे लागण्याची शक्यता आहे.
विभागिय कोकण आयुक्तांच्या दि. ८ जूनच्या सुचनेनुसार पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी उतारे, दाखल्यांच्या शुल्कात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. तशी सुचना रत्नागिरी पालिकने प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पालिकेने नवा ठराव केला आहे. त्या ठरावानुसार असेसमेंट उतारा २०० रु., असेसमेंट नाव दाखल व दुरुस्त करणे ७५० रु, व्यावसायिकसाठी २००० रु., वसुली विभागाकडून देण्यात येणारे सर्व दाखले २०० रु.प्रत्येकी, भुखंड नसलेबाबत २००रु. सव्र्हेक्षण उतारा २० रु.प्रती प्रत असे दर आकारण्यात येणार आहेत. पुर्वी हे दर निम्मेच होते. त्यामुळे नव्या दरवाढीवरुन पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता आहे.सध्या पालिकेत नगरसेवक नाहीत. तर प्रशासकांच्या ताब्यात पालिकेचा कारभार आहे. अशा वेळी दरवाढ करण्याचे अधिकार थेट प्रशासकांना आहेत. त्यामुळे आता या दरवाढीला विरोध करणार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दि. ११ नोव्हेंबरपर्यंत नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. हरकती न आल्यास दि.१ जानेवारीपासून नव्या शुल्काची अंमलबजावणी सुुरु होणार आहे.नव्या दरवाढीची सुचना प्रसिद्ध झाल्यानंतरही एकाही राजकिय पक्षाने याला विरोध केलेला नाही. तर अध्यापपर्यंत एकाही नागरिकांची हरकत न आल्याने भविष्यात नवे दर लागू होण्याची शक्यता आहे.