रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात तब्बल ६७ इमारती या धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. या सर्व इमारतधारकांना रनप प्रशासनाने वारंवार नोटिसा बजावून देखील या धोकादायक इमारतींचा वापर सुरू आहे. यापैकी अनेक इमारती या अडचणीच्या ठिकाणी आहेत. यामुळे शेट्येनगर सारखी दुर्घटना घडल्यास या दुर्घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला असून नगर परिषद प्रशासन भविष्यात कोणता कठोर निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
नगर परिषदेकडून प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमातींचे सर्वेक्षण करण्यात येते. धोकादायक इमारतींना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात येते. यावर्षी देखील ही कारवाई करण्यात आली. परंतु नुकत्याच झालेल्या शेट्ये नगर येथील दुर्घटनेनंतर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रत्नागिरी नगर परिषदेकडून धोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण पुर्ण करण्यात आले आहे. सर्वेक्षण केल्यानंतर धोकादायक असलेल्या इमातींच्या घरमालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. ज्यांच्या घरांचा काही भाग धोकादायक आहे त्यांनी तत्काळ दुरस्स्ती करून घ्यावी. ज्या इमारती, इमले पावसाळयात कोसळतील त्याची खबरदारी मालकांनी स्वत: घ्यावयाची आहे. अन्यथा पालिकेमार्फत या इमारती तोडण्यात येणार आहेत अशी नोटीस बजावण्यात आली असली तरी या धोकादायक इमारतींचा वापर अद्यापही सुरूच आहे. या धोकादायक इमारतींपैकी काही इमारती रहिवासी वापरासाठी तर काही सामुदायिक वापरासाठी आहेत.
शेट्ये नगर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर या इमारतींच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला आहे. या धोकादायक इमारतींवर कारवाईसाठी रनप प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. भविष्यात या इमारतीमध्ये शेट्ये नगर सारखी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.