रत्नागिरीत कचरा कायम ; कारवाईची गरज
रत्नागिरी:- निर्ढावल्यासारखा बेशिस्तपणे कचरा टाकणार्या नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी पालिकेने शहरात १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले; मात्र तौक्ते वादळाचा फटका या कॅमेऱ्यांना बसला. त्यापैकी ४ कॅमेरे बंद पडले आहेत. त्याची दुरुस्ती सुरू आहे. परंतु २४ तास कॅमेऱ्यांचा वॉच असूनही काही नागरिक सवयीप्रमाणे कचरा टाकतच आहेत. यापैकी एकावरही कारवाई झालेली नाही त्यामुळे पालिकेचा लाखोंचा खर्च निष्फळ ठरत आहे. आता तेथे सेल्फी पॉइंट बनविण्याची टुम काढण्यात आली आहे.
बेशिस्त नागरिकांनी शिस्त लावण्यासाठी पालिकेला कठोर पावले उचरण्याची गरज आहे. पटवर्धन हायस्कुलसमोरील कचराकुंडीसमोर कॅमेरा बसवूनही फायदा झालेला नाही.आरोग्य सभापती निमेश नायर यांनी आज सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत माहिती घेतली. तेव्हा हे सत्य पुढे आले. मोबाईलला हे सीसीटीव्ही कनेक्ट आहेत. अनेक नागरिक बेशिस्तपणे कचरा टाकताना दिसत आहेत; मात्र पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने सीसीटीव्ही लावूनही फारसा फायदा झालेला नाही. नागरिक स्वच्छ रत्नागिरीला अस्वच्छतेचे गालबोट लावण्याचे काम करीतच आहेत. पटवर्धन पटवर्धन हायस्कूलसमोरील कचराकुंडी तर कायम कचऱ्याने भरलेली असते. तेथे पालिकेने कर्मचारी नेमला, सीसीटीव्ही लावला आहे. आता तर पुन्हा लाखो रुपये खर्च करून सेल्फी पॉइंट तयार करण्यात येणार आहे. बेशिस्त नागरिकांवर कारवाई केल्याशिवाय अस्वच्छतेचा डाग पुसला जाणार नाही. पालिकेने आता अधिकारांचा वापर करण्याची गरज या प्रकारामुळे अधोरेखित झाली आहे.
रत्नागिरी पालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरात १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. पालिकेला स्वच्छतेचा देशपातळीवरील पुरस्कार मिळाल्यानंतर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून रत्नागिरी शहराची ओळख राहावी, यासाठी वारंवार पालिकेकडून प्रयत्न केला जात आहे. शहर कचराकुंडीमुक्त केले जात आहे. प्रत्येक प्रभागात घंटागाडी सुरू करून घर आणि अपार्टमेंटपर्यंत जाऊन पालिकेचे कर्मचारी कचरा गोळा करत आहेत; मात्र सुशिक्षित आणि बेशिस्त नागरिक गालबोट लावत आहेत. हे रोखण्यासाठी पालिकेने शहरात १२ कुंड्यांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावले.तेही निष्फळ ठरल्याने पालिकेला आता कठोर पावले उचलल्याशिवाय पर्याय नाही.