रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वेस्टेशन ते भोके रेल्वेस्टेशनच्या दरम्याने पटना सुपरफास्ट एक्स्प्रेसला रेल्वेची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना बुधवार २३ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वा. सुमारास घडली.
जयश्री जयवंत शिंदे असे रेल्वेची धडक बसून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रेल्वे पोलिस कर्मचारी अनंत तुकाराम सुवारे (५६, मूळ रा. कुरचुंब, पो. आडवली, लांजा) यांनी याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, ते रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे पोलिस हवालदार पदावर कार्यरत आहेत. त्यांना २३ एप्रिल रोजी रात्री १० ते गुरुवार २४ एप्रिल रोजी सकाळी ६ वा. पर्यंत ड्युटी नेमण्यात आली होती. ते कामावर कार्यतर असताना त्यांना २३ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वा. पटना सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या टीसीने एक महिला रत्नागिरी रेल्वेस्टेशन ते भोके रल्वेस्टेशनच्या दरम्यान रेल्वेची धडक बसून जखमी झाल्याची माहिती दिली.
रेल्वे पोलिस कर्मचारी अनंत सुवारे यांनी ही माहिती रत्नागिरी स्टेशनमास्तरांना दिल्यानंतर त्या जखमी महिलेला गाडीने रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे आणून तेथून रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.
तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी पहाटे ४ वा. सुमारास जयश्री शिंदेला तपासून मृत घोषित केले. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या महिलेकडे तिचे आधार कार्ड मिळाले असून त्यावरुन तिची ओळख पटली आहे. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.