रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते मडगाव विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या विद्युतीकरणाच्या कामाची आज रेल्वेच्या सुरक्षा तपासणी पथकाने लोको ट्रेन चालवून चाचणी घेतली. या चाचणीसाठी आलेल्या सीआरएस पथकाने मडगाव ते रत्नागिरी अशी इलेक्ट्रिक लोकोची ट्रायल घेतली. या तपासणीत झालेले विद्युतीकरणाचे काम योग्य असल्याबाबतचा निर्वाळा पथकाकडून देण्यात आल्याचे समजते. या पाहणी अहवालानंतरच विद्युतीकरणाद्वारे कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक केव्हा सुरू होईल हे निश्चित होणार आहे.
कणकवली रेल्वे स्टेशन लगत नाथ पै नगर या भागात असलेल्या कोकण रेल्वेच्या ट्रॅक्शन सब स्टेशनची देखील विद्युत भार सुरू करण्यासंदर्भात तांत्रिक दृष्ट्या या पथकाकडून पाहणी करण्यात आली. या सब स्टेशन मधील तांत्रिक बाबींची पाहणी केल्यानंतर हे पथक तपासणी करत मडगावच्या दिशेने गेले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण व कणकवली या दोन ठिकाणी ही सबस्टेशन करण्यात आली आहेत. या ट्रॅक्शन सब स्टेशनचे नियंत्रण बेलापूर येथून होणार आहे. पाहणी नंतर हे सब स्टेशन काल रात्री पासून चार्ज करत आज सीआरएस लोको ट्रेनची ट्रायल घेण्यात आली. कोकण रेल्वेच्या विद्युतीकरण करिता महावितरणकडून एक्सट्रा हाय व्होल्टेज सप्लाय स्वतंत्ररित्या देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
या तपासणी दरम्यान कोकण रेल्वेच्या मार्गावरील असलेल्या बोगद्यामध्ये जाऊन देखील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी पाहणी केली. कोकण रेल्वे मार्गावर यापूर्वी रत्नागिरी पर्यंत व कारवार ते उडपीपर्यंत विद्युतीकरण सुरू करण्यात आले होते. रत्नागिरी ते मडगाव या भागातील विद्युतीकरण होऊन सुद्धा चाचणी झाली नव्हती. पण हे काम आता पूर्ण झाले असून या मार्गावरून लवकरच कोकण रेल्वे विद्युतीकरणावर धावणार आहे.