रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये सरपंचपदाचे दोन तर सदस्यपदाचे सात अर्ज बाद झाले. सरपंचपदाचे 84 अर्ज तर सदस्यांचे 422 अर्ज वैध ठरले असून अर्ज मागे घेण्याची मुदत 7 डिसेंबर आहे.
सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकींच्या अर्जांची छाननी करण्यात आली. यात सरपंचपदासाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी साठरे व सत्कोंडी या ग्रामपंचायतीमधील एक-एक अर्ज बाद झाले. तर सदस्यपदासाठी फणसवळे, पिरंदवणे, निवळी, धामणसे, चाफेरी व निवेंडी येथील एक-एक अर्ज बाद झाला. त्यामुळे 29 ग्रा.पं.त सरपंचपदासाठी 84 तर सदस्यपदासाठी 422 उमेदवार रिंगणात आहेत. बुधवार दि. 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने आणखी किती उमेदवार निवडणुकीतून माघार घेतात याकडे ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
भाजप व बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये अद्याप युतीचे गणित जमलेले नाही. त्यामुळे भाजपकडून 14 ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी उमेदवार रिंगणात आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाने सर्वच जागेवर उमेदवार दिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीपयर्र्त भाजप व बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये युतीसाठी तडजोड होण्याची शक्यता कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.