रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात शुक्रवारी रात्री 11 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 5 रुग्ण कुवारबाव परिसरातील आहेत. तर रत्नागिरी शहरातील माजी नगरसेवक अविनाश साटम यांचा कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा नव्याने 11 पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले. यातील पाच रुग्ण हे कुवारबाव परिसरातील आहेत. याशिवाय रेल्वे स्टेशन, कर्ला येथे प्रत्येकी 1, गोळप येथे 2, किर्तीनगर येथे 2 तर एक सिविल ऍडमिट रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
रत्नागिरीच्या कोविड रुग्णालयात उपचारा दरम्यान माजी नगरसेवक अविनाश साटम यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली. अविनाश साटम यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रत्नागिरी नगर परिषदेत अनेक वर्षे नगरसेवक पदाची जबाबदारी पार पाडली. या कालावधीत त्यांनी शहरातील अनेक प्रश्न धडाडीने मांडले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.