रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यात नव्हे तर देशात अव्वल बँक: नाबार्ड महाप्रबंधक बी. श्रीधरन

रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक राज्यातीलच नव्हे तर देशातील अव्वल दुसर्‍या क्रमांकाची आहे. बँकेचे कामकाज उत्तम असून शाळेतील ‘अच्छे बच्चे’ असेच त्यांचे वर्णन करावे लागेल, असे सांगत नाबार्डचे महाप्रबंधक बी. श्रीधरन यांनी कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

कोरोनानंतर कृषी, सहकार क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तळागाळातील बँकांसह सहकारी विकास सोसायटींना भेट देण्यासाठी नाबार्डचे सोळा जणांचे पथक बी. श्रीधरन यांच्या नेतृत्त्वाखाली रत्नागिरी जिल्हा दौर्‍यावर आले आहेत. देशामध्ये उत्कृष्ट काम म्हणून ओळखल्या जाणार्‍या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला या पथकाने शनिवारी (ता. 12) भेट दिली. त्यानंतर पथकाकडून बँकेसह जिल्ह्यातील स्थितीची माहिती घेतली. यावेळी आर. एस. भगवाने, एस. व्ही. रंगराव आदी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना श्रीधरन यांनी बँकेच्या कार्यप्रणालीबद्दल गौरवोद्गार काढले. आरडीसीसीच्या लांजा आणि साखरीनाटे येथील विकास सहकारी सोसायटींनाही त्यांनी भेटी दिल्या.
ते म्हणाले, कोरोनामधुन सावरण्यासाठी शेतकर्‍यांना काय हवे आहे, याची माहिती तळागाळात जाऊन घेण्याचे काम चालू आहे. इच्छुक असलेल्यांना कर्ज मिळते का, प्रस्ताव रद्द का होत आहेत याची कारणेही जाणून घेत आहोत. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमधून गावाकडे परतलेल्यांना तेथेच रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी गावांचा सर्व्हे केला जाणार असून तेथील उत्पादने कोणती, कृषी प्रक्रिया उद्योग सुरु करता येणार का याची माहिती घेतली जाईल. भविष्यात निर्यातीवर भर दिला जाणार असून त्यासाठी दर्जेदार मालाचे उत्पादन कसे मिळवता येईल याकडे लक्ष दिले जाईल. त्यादृष्टीने नवीन धोरणे तयार करण्याचा विचार आहे.

हापूसवर आधारीत प्रकल्प आले पाहीजे

सध्याची तरुणी पिढी ही मेहनत करण्यासाठी मागे नाही. मात्र त्यांच्या कौशल्यानुसार काम मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी एखादा कृषी प्रक्रिया उद्योग सुरु केला, तर त्याच्याशी निगडीत व्यावसायांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी नाबार्डकडे पुरेसा निधी उपलब्ध आहे. कोकणात कृषी-पर्यटनाला वाव आहे. येथील हापूसवर आधारीत प्रकल्प उभारण्यावर भर दिला तर निश्‍चितच त्यामधून रोजगार निर्मिती होऊ शकते. केरळ, गोव्याप्रमाणेच याठिकाणी पर्यटन व्यावसायाला चालना मिळू शकेल, असे श्रीधरन यांनी सांगितले.