लाखोंचा महसूल बुडाला; बोगस नोंदणी झालेली वाहने भंगारात निघणार
रत्नागिरी:- राज्यातील अन्य आरटीओ विभागातील काही एजंटच्या हुशारीने झालेले बोगस वाहन नोंदणीचे लोन रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातही पसरले आहे. ऑनलाईन नोंदणीतील पळवाट शोधत चासेस नंबरमध्ये जादा डॉट (स्टार किंवा अन्य कॅरेक्टर) टाकून वाहनांच्या बोगस नोंदणी करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यातील १३६ वाहनांचा समावेश असून ती भंगारात निघण्याची भिती आहे. या बोगस नोंदणीमुळे सुमारे १७ लाख ४९ हजाराचा टॅक्स आणि पसंती क्रमांकाचे ८ लाख ७९ हजार एवढा शासनाचा महसुल बुडाला आहे. या प्रकरणी तिघांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली होती. यापैकी १०९ जणांनी टॅक्स भरला असून २२ जणांना टॅक्स भरण्याची अंतिम नोटीस बजवाण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे बोगस नोंदणी झाल्याची तक्रार परिवहन कार्यालयाकडे झाली होती. या तक्रारीनंतर राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची चौकशी करण्यात आली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वाहनांच्या बोगस नोंदणी झाल्याचे उघड झाले आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडुन मिळालेल्या माहितीवरून जिल्ह्यात बोगस नोंदणी झाली १३६ मोठी वाहने आहेत. एका वाहनाचा टॅक्स लाख ते दीड लाखाच्या वर आहे. त्यापैकी काहींचा टॅक्स कमी आहे. २००७ मध्ये वाहन नोंदणी ऑनलाईन झाली. काही एजंन्टना रजिस्ट्रेशनसाठी लॉगिन आयडी देण्यात आला आहे. त्यावरून त्या-त्या एजंटकडून वाहनांची नोंद होते. मात्र काही हुशार एजंटनी दुसऱ्याचा आयडी वापरला, एवढेच नाही तर ऑनलाईन नोंदणीमध्ये पळवाट शोधुन वाहनांच्या चासेस नंबरमध्ये डॉट टाकून (वेगळा स्टार, हॅस असे) त्यांनी नोंदणी करून घेतली.
वाहनांचे कर व शुल्क भरणा करून न घेता वाहनांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर परिवहन आयुक्तांनी येथील तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि एकाचा समावेश आहे. कार्यालयामध्ये सव्वाशे वाहनांचे रजिस्ट्रेशनमध्ये अनियमितपणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील यामध्ये १३६ वाहनांचा समावेश आहे. त्यापैकी १०९ जणांनी टॅक्स भरणा केला आहे. त्यांची अधिकृत नोंदणी करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. एकुण १७ लाख ४९ हजार टॅक्स भरणा झालेला नाही. तर अनेकांनी पसंती क्रमांकासाठी ८ लाख ७९ हजार रुपये भरले होते. ३० दिवस त्याची वैधता मुदत असते. तेही रक्कम परस्पर वापरल्याचे चौकशीत पुढे आले आहे. ज्या २२ वाहन धारकांनी टॅक्स भरलेला नाही. त्यांना पुढील सात दिवसाची मुदत देत अंतिम नोटीस बजावली आहे. अन्यथा या वाहनांची नोंदणी रद्द होऊन ती वाहने भंगारात काढण्याची वेळ येणार आहे.