रत्नागिरी:- गिर्यारोहण क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी बजावून चिपळूण शहर परिसरातील पूरग्रस्तांना सर्वात प्रथम मदतीचा आधार दिल्याबद्दल रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सला शिखर सावरकर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
गतवर्षीपासून स्वा. वि. दा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाने शिखर सावंत पुरस्काराची घोषणा केली आहे. शिखर सावरकर जीवनगौरव, शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था, शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहक अशा तीन पुरस्कारांचा यात समावेश आहे. स्मृतीचिन्ह, मानपत्र, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था यासाठी रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सची निवड करण्यात आली आहे. शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहक पुरस्कारासाठी सुशांत अणवेकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी ही घोषणा केली. कोवीड परिस्थितीनुसार लवकरच पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या २५ वर्षांपासून रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स यांनी साहसासोबत सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवली आहे. चिपळूण खेड शहर परिसरातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात आली. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ गिर्यारोहक श्री.प्रदीप केळकर यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सची शिखर सावरकर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारात संस्थेच्या प्रत्येक सदस्याचा, हितचिंतकांचा, प्रमुख मार्गदर्शक श्री.प्रदीप केळकर यांचा मोलाचा वाटा असल्याचे मत रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सचे अध्यक्ष श्री.वीरेंद्र वणजू यांनी व्यक्त केले आहे.