गरजेप्रमाणे कामगार भरती; आवश्यक जमिनीचे हस्तांतरण
रत्नागिरी:- अवसायानात गेलेली मिऱ्या बंदर येथील भारती शिपयार्ड कंपनी योमन शिपयार्ड कंपनीने घेतली आहे. या कंपनीकडून पावसाळ्यानंतर नवीन जहाजबांधणी व दुरुस्तीच्या कामाची सुरवात केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक जमिनीचे हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मिऱ्या आणि परिसरातील गावांना रोजगाराच्यादृष्टीने नवी संधी उपलब्ध होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे, असे स्थानिक ग्रामस्थ अजित सावंत यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.
योमन शिपयार्ड कंपनी या नव्या उद्योगामुळे मिऱ्या गाव आणि परिसराचा पूर्वीप्रमाणे विकास होण्यास मदत होणार आहे. कंपनीचे व्यवस्थापक (मालक) मिश्रा यांनी कंपनी सुरू होण्यापूर्वीच रत्नागिरी-मिऱ्या परिसरातील सुशिक्षित-बेरोजगार तरुणांची गरजेनुसार भरती सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे स्थानिकांनी कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन कंपनीने केले आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत झाल्यानंतर त्यांच्या पुढाकाराने नवीन कंपनी रत्नागिरीत आली आहे. मिऱ्या गावाच्या सर्वांनी विकासासाठी या पूर्वीही मंत्री सामंत यांनी फार मोठे योगदान दिले आहे. गावातील धूपप्रतिबंधक बंधारा असो, नळपाणी योजना असो, रस्ते, पाखाड्या, गटारे व भूमिगत विद्युतवाहिनी, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री (कै.) पी. के. सावंत यांचे स्मृतिभवन या सारखी कामे पूर्ण केली आहेत. मिऱ्या गाव पूर्वीप्रमाणे यापुढेही सामंत यांच्या पाठीशी उभा राहील याची ग्वाही देतो, असे अजित सावंत यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.