मोफत धान्ययोजनेचे ११ लाख ६ हजार लाभार्थी 

कोरोना काळातील योजना; नोव्हेंबर अखेरीस होणार बंद 

रत्नागिरी:- कोरोना महामारीच्या काळात दुसऱ्या लाटेत आर्थिक दुर्बल घटकांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत नियमित धान्याबरोबरच मोफत पाच किलो धान्य प्रतिसदस्य देण्याची योजना शासनाने जाहीर केली होती. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून सर्व परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ नोव्हेंबरअखेरीस बंद होणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११ लाख ६ हजार १५५ लोकांना मोफत धान्याचा लाभ मिळाला. यापुढे लाभार्थ्यांना केवळ नियमित धान्याचे नियतनावर अवलंबून राहावे लागणार आहे. 

शासनाच्या या योजनेचा राष्ट्रीय आपत्तीमध्ये सर्वसामान्य व गरजूंना मोठा फायदा झाला. लॉकडाउनच्या काळात त्यांना पोटभर अन्न मिळू लागले. राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आणि १५ एप्रिलपासून राज्यात पुन्हा लॉकडाउन करण्यात आले. या काळात आर्थिक दुर्बल घटकांची उपासमार होऊ नये, यासाठी शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून प्राधान्य आणि अंत्योदय या दोन गटांतील लाभार्थ्यांसाठी मोफत धान्य वितरण सुरू केले. मे आणि जून या दोन महिन्यांसाठी शिधापत्रिकावरील प्रतिसदस्य ५ किलो धान्य मोफत देण्याची योजना जाहीर केली. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ही योजना नोव्हेंबर महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे प्राधान्य आणि अंत्योदय या दोन प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना सात महिने मोफत धान्याचा लाभ मिळाला. नोव्हेंबर महिन्यांनंतर मोफत धान्य योजना बंद होणार आहे.सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लॉकडाउन काळात मे ते नोव्हेंबर २०२१ या सात महिन्यांच्या काळात अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य आणि अंत्योदय कार्डधारकांना प्रति सदस्य पाच किलो धान्य शासनाकडून मोफत दिले जात होते. त्यामुळे आता नोव्हेंबरनंतर मोफत धान्य बंद होणार असून दोन रुपये किलो गहू आणि ३ रुपये किलोने तांदूळ एवढेच धान्य नियमित मिळणार आहे. त्या आधी सात महिन्यात जिल्ह्यातील ११ लाख ६ हजार १५५ लोकांना मोफत धान्याचा लाभ मिळाला.