मेर्वी येथे महिलेला मारहाण प्रकरणी पती, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

पावस:- तालुक्यातील मेर्वी- खालची म्हादयेवाडी येथे महिलेला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पती, सासरे यांच्या विरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा हरी भातडे (९०), व प्रकाश कृष्णा भातडे (५५ दोघेही रा. मेर्वी खालची म्हादयेवाडी-पावस, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. ११) सकाळी साडेआठ वाजता मेर्वी-खालची म्हादयेवाडी येथे घडली.

फिर्यादी सुजाता प्रकाश भातडे (वय ४०, रा. मेर्वी-म्हादयेवाडी, रत्नागिरी) या व संशयित नात्याने पती-पत्नी व सासरे आहेत. त्यांचेत कौंटुबिक कारणावरुन वाद निर्माण झालेले आहेत. त्यामुळे फिर्यादी या २००८ पासून घराशेजारी विभक्त राहतात. न्यायालयाच्या आदेशाने ५ हजार पोटगी व घरातील एक खोली राहण्यासाठी दिलेली आहे. शनिवारी सकाळी फिर्यादी या त्यांच्या मुलीसोबत बोलत होत्या. त्याचा राग मनात धरुन संशयितांनी फिर्यादी यांना मुलीसोबत बोलायचे नाही असे सांगून शिवीगाळ करुन तु इथे घरात राहयाचे नाही असे बोलून वाद निर्माण केला. संशयितांनी हातात लाकडी दांडका घेवून फिर्यादी यांच्या डाव्या हातावर दांडक्याने जोराचा फटका मारला. त्या बाथरुमध्ये पडल्या. याचा फायदा घेऊन संशयित प्रकाश यांनी लाकडी दांडक्याने फिर्यादी यांना उजव्या पायावर, डाव्या पायावर, उजव्या पायाच्या मांडीवर मारुन शिवीगाळी करुन घरातून बाहेर जाण्यास सांगून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सुजाता भातडे यांनी पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.