मुसळधार पावसाने जिल्ह्यात अडीचशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

रत्नागिरी:- गेल्या 28 दिवसांत जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने अनेक भागात पूरस्थितीने मोठे नुकसान केले. या झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात 145 गावांतील 1 हजार 191 शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. भात, नागली आणि इतर पिके अशा एकूण 231.49 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाकडून तयार करण्यात आला आहे.

जिल्ह्यात 1 ते 28 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालेले होते. यावर्षी पावसाने खरीपातील शेत लावणी कामांना चांगली साथ दिली. पण अतिवृष्टी तसेच सततच्या पावसा फटका अनेक गावांतील शेतीला बसला. मोठय़ा नदय़ांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे लगतचे शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले. अनेक भागात छोटय़ा नदय़ा, नाल्यांच्या पुराचे पाणीही शेतीक्षेत्रात घुसल्याने फटका बसला. त्या झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनस्तरावरून देण्यात आले.

जिल्ह्यात खरीप पिकांखालील भातो सरासरी एकूण 68088.37 हेक्टर इतके क्षेत्र आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष पेरणीचे 35888.06 क्षेत्र आहे. तर नाचणी पिकाखालील सरासरी 10398.21 हेक्टर क्षेत्र आहे. प्रत्यक्ष 3299.88 हेक्टरवर पेरणी झालेली आहे. या खरीपातील शेती लावण्याची कामे सद्यापर्यंत सुमारे 70 टक्के पूर्णत्वास गेलेली आहेत. उर्वरित कामेही आठवडाभरापर्यंत पूर्णत्वास जाण्याचा अंदाज कृषी विभागस्तरावरून व्यक्त केला जात आहे.

त्यावरून जिल्हा कृषी विभागस्तरावरून जिल्हाभरातील नुकसानग्रस्त कृषीक्षेत्राचे पंचनामे करण्यात येत आहेत. त्यानुसार 1 ते 28 जुलै दरम्यान एकूण 145 गावांतील 1 हजार 191 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यामध्ये एकूण भातक्षेत्राचे 228.39 हेक्टर, नाचणी पिकाचे 0.13 हेक्टर तर इतर पिकांचे 2.97 हेक्टरवरील नुकसान झालेले आहे.

त्यानुसार मंडणगडमध्ये 10 गावांतील एकूण 54 शेतकऱ्यांचे 4.54 हेक्टर, दापोली 31 गावांतील 150 शेतकऱ्यांचे 17.43 हेक्टर, खेडमध्ये 54 गावांतील 533 शेतकऱ्यांचे 174.55 हेक्टर, चिपळुणमधील 7 गावांचे 28 शेतकऱ्यांचे 0.68 हेक्टर, गुहागरमध्ये 10 गावांतील 18 शेतकऱ्यांचे 1.28 हेक्टर, संगमेश्वरमध्ये 23 गावांतील 360 शेतकऱ्यांचे 29.05 हेक्टर, राजापूर 10 गावांतील 48 शेतकऱ्यांचे 3.96 हेक्टरवरील नुकसान झाले आहे.