रत्नागिरी:- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौर्याचे नियोजन आहे. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून जोरदार तयारी सुरु आहे. या दौर्यात मुख्यमंत्र्यांकडून शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे उद्घाटन होणार असल्याने मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्यागटातील इतर अनेक मंत्रीगणही येण्याची शक्यता आहे. ना. उदय सामंत आणि प्रशासन पातळीवरील तयारीची धावपळ पाहता अनेक मंत्र्यांच्या उपस्थिती लागण्याच्या शक्यतेस दुजोरा मिळत आहे.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील सर्वच आमदार आणि मंत्र्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. याच स्व. बाळासाहेब ठाकरे नावाने असलेल्या तारामंडळाचे उद्घाटन होणार असल्याने मुख्यमंत्र्याच्या गटातील मंत्रीमंडळ या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याची दाट शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा हा दौरा 10 ते 14 डिसेंबरच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी शासकीय महामंडळावरील अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. नागपूर समृद्धी महामार्गाचा शुभारंभ 11 डिसेंबर रोजी होणार असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा रत्नागिरी दौरा 12 ते 14 डिसेंबर दरम्यानच होईल अशी अपेक्षा आहे.
जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा अनेक शासकीय कार्यालयांमध्ये बैठकांची धावपळ सुरु आहे. बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकार्यांमध्येही मुख्यमंत्र्यांच्या दौर्याची तयारी केली जात आहे. या दौर्यापूर्वीच पालकमंत्री उदय सामंत यांनी संघटन पातळीवरील रिक्त पदांवर नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे सर्व जुने-नवे पदाधिकारी नियोजनांच्या बैठकांमध्ये गुंतले आहेत. या सर्व पक्षपातळीवरच्या घडामोडींसोबत ना. सामंत यांनी जिल्ह्यातील दौरे वाढवून विकासकामांना चालना दिली आहे. यातून मुख्यमंत्र्यांच्या सभेला तुफान गर्दी करून आपली लोकप्रियता दाखवून देणार आहेत. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी स्टेडियमची जाहीर सभेसाठी निश्चिती होण्याची शक्यता आहे.