मासळीसह भाज्यांचे दर गगनाला; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

रत्नागिरी:- मार्गशीर्ष महिन्यातील उपवासाच्या दिवसात भाज्यांचे दर चांगलेच वधारले होते. हा महिना संपल्यानंतर दर उतरतील अशी अपेक्षा असतानाच कोरोनामुळे आठवडा बाजार पुन्हा बंद झाले असल्याने भाज्या महागच विकल्या जात आहेत. त्याचबरोबर माशांचे दरही वाढले असल्याने सर्वांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.

दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेले आठवडा बाजार कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे पुन्हा बंद झाले आहेत. त्यामुळे भाज्यांचे दर हळूहळू वाढू लागले आहेत. गेल्या काही महिन्यात कांदा 40 ते 50 रुपये किलोने विकला जात होता. आता त्याचे दर 35 ते 40 रुपये किलो एवढे असले तरी ते सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरच आहेत. कांद्याबरोबरच बटाट्याचे दरही कमालीचे वाढले होते. बटाटा 30 रुपये किलोने विक्री होत आहे.

याबरोबरच वांगी, फ्लॉवर, कोबी, फरसबी, गवार, पडवळ, काकडी, कारले, मटार यासारख्या भाज्यांचे दरही किलोला 80 ते 100 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. एक किलो टोमॅटोही 35 ते 40 रुपये किलोला विकला जात आहे. हिरवी मिरचीही 25 ते 30 रुपये पाव किलो विकली जात आहे. पालेभाज्यांची जुडीही 15 ते 20 रुपये एक याप्रमाणे मिळत आहे. परजिल्ह्यातून भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर वाढू लागले
आहेत.
 

मार्गशीर्ष महिन्यात घरोघरी उपवास असतात. त्यामुळे या काळात मांसाहार केला जात नाही. परिणामी किरकोळ बाजारात माशांचे दर उतरले होते. सुरमई 300 रुपये किलो. पापलेट 500 रुपये, बांगडा 70 ते 100 रुपये, कोळंबी दर्जानुसार 70 ते 400 रुपये किलोने मिळत होती. मात्र, हा महिना संपताच माशांचे दर कडाडले आहेत. सुरमई 400 ते 600, पापलेट 800 ते 1000, बांगडा 100 ते 150, कोलंबी 120 ते 500 रुपये किलोने मिळत आहे. त्यातच मागील काही दिवस वेगाने वारे वाहत असल्यामुळे नौका किनारीच उभ्या आहेत. यामुळे बाजारात मासळीचे प्रमाणही कमी आहे.

रत्नागिरीतील काही भाजी विक्रेते 10 रुपये परडी याप्रमाणे भाजीची विक्री करत आहे. यामध्ये वांगी, भोपळी मिरची, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची, फरसबी, वांगी, गवार यांचा समावेश आहे. या परडीचे वजन साधारणतः अर्धा किलो ते अगदी एक किलो एवढे भरते. या मालाचा दर्जा मात्र दोन नंबरचा असतो.