कारवाईसाठी बुधवारचा मुहूर्त; पोलीस बंदोबस्त मागवला
रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर येथील मुदत संपलेले 11 गाळे ताब्यात घेण्यास अखेर पालिकेला मुहुर्त मिळाला आहे. प्रशासनाकडुन ताब्यात घेण्यास चालढकल होत होती. सेनेच्या सत्ताधार्यांनी सभागृत झालेल्या आदेशाचे पालन करण्याबाबत मालमत्ता विभागावर दबाव टाकला. त्यामुळे बुधवारी (ता. 3) सकाळी अकरा वाजता पोलिस बंदोबस्तात गाळे ताब्यात घेतले जाणार आहेत. नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी हे स्पष्ट केले.
पालिकेच्या मालकीच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणातील 11 गाळ्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून सुरू आहे. मुदत संपली तरी हे गाळे ताब्यात घेण्यात आले नव्हते. नगरसेवक निमेश नायर यांनी ही बाब सभागृहापुढे आणली होती. त्यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागली. पालिकेने गाळे ताब्यात घेण्याची हालचाल सुरू केली. गाळेधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच नगर विकास मंत्रालयाकडे मुदतवाढीसाठी याचना केली. उच्च न्यायालयाने पालिकेची बाजू मान्य करीत 4 आठवड्यात निर्णय घेऊन दोन महिन्यात प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली. ही निविदा प्रक्रिया स्थगित करण्यासाठी रत्नागिरी येथील दिवाणी न्यायालयात अर्ज केला. दिवाणी न्यायालयाने निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला.
पालिकेने त्यानंतर गाळ्यांची लिलाव प्रक्रिया केली. त्यामध्ये एका गाळ्याचा लिलाव 75 लाखापर्यंत गेला होता. मात्र पुढे कोणतीही प्रक्रिया झाली नाही. अखेर नव्या मूल्यांकनानुसार गाळ्यासाठी 7 लाख 81 हजार रुपये अनामत असून 24 हजार 300 रुपये मासिक भाडे आहे. अकरा गाळे ताब्यात घेण्याबाबत पालिकेच्या सभेत निर्णय झाला. परंतु नगराध्यक्षांच्या आदेशाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. शुक्रवारी गाळे ताब्यात घेण्याबाबत अधिकार्यांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. यावरून सत्ताधारी चांगलेच संतापले. त्यांनी मालमत्ता विभागाच्या अधिकार्यांना चांगलेच सुनावले. तेव्हा सत्ताधार्यांच्या दबावाला नमुन अखेर बुधवारी (ता. 3) सकाळी अकरा वाजता पोलिस बंदोबस्तात गाळे ताब्यात घेण्यात येणार आहेत, नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी हे आज स्पष्ट केले.