रत्नागिरी:- चाफे ग्रामपंचायतीच्या निवडणूकित आपल्या विरोधात उभा राहून निवडून आला. हा राग मनात ठेऊन तरुणाला माजी सरपंच आणि त्याच्या कुटुंबियांनी 12 ऑगस्ट 2015 रोजी मिरवणेवाडी येथे लाथाबुक्क्यानी मारहाण करत त्याच्या गाडीची काच फोडून नुकसान केले होते. याप्रकरणातील 5 आरोपीना न्यायालयाने प्रत्येकी 4 हजार प्रमाणे 20 हजार रुपये दंड तो न भरल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून 5 हजार रुपये फिर्यादीला नुकसान भरपाई म्हूणन देण्यात येणार आहे.
सुभाष पुंडलिक रहाटे (56),ओंकार सुभाष रहाटे(22), भाग्यश्री सुभाष रहाटे (42),प्रशांत पुंडलिक रहाटे(30,चौघेही रा. चाफे, रत्नागिरी ) आणि गजानन वसंत रहाटे(32, रा. तेलीआळी, रत्नागिरी ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपिंची नावे आहेत. याप्रकरणी पद्मशेखर वसंत मुळये (29,रा.चाफे, रत्नागिरी ) याने जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार,12 ऑगस्ट 2015 रोजी सायंकाळी 6 वा. सुमारास पद्मशेखर मुळये आपल्या ताब्यातील टाटा एस गाडी (एमएच-08-डब्ल्यू-1344) घेऊन मिरवणेवाडीतील हनुमंताच्या देवळातून घरी जात होता. तेव्हा त्याच्या सोबत वासुदेव गोवळकर,चाफे तंटामुक्ती अद्यक्ष शामल गावडे, नारायण गावडे हेही होते. शामल गावडे यांचे घर आल्यावर पद्मशेखरने गाडी थांबवली असता तिथे दबा धरून बसलेल्या सर्व आरोपीनी गाडीला गराडा घातला. त्यानंतर पद्मशेखर मुळयेला गाडी बाहेर काढून सर्व आरोपीनी त्याला लाथाबुक्क्यानी मारहाण करत त्याच्या गाडीवर दगडफेक करून काच फोडली.
दरम्यान, गाडीतील इतर तिघांनी बाहेर येत पद्मशेखर मुळयेची सुटका केली.तेव्हा सुभाष रहाटेने तू पोलिसात तक्रार दिलीस तर तुला गाडीसाहीत जाळून टाकू अशी धमकी दिली होती. जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही या प्रकरणात जयगड पोलीस कोणतीही कारवाई करणार नाहीत याची खात्री झाल्याने मुळये यांनी आपली फिर्याद न्यायालयात दाखल केली होती. या खटल्यात पद्मशेखर मुळये यांच्यावतीने ऍड. अनुराग अशोक पंडित यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने 5 ही आरोपीना प्रत्येकी 4 हजार प्रमाणे 20 हजार रुपये दंड तो न भरल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.दंडाची रक्कम वसुल झाल्यावर त्यातील 5 हजार रुपये पद्मशेखर मुळये यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी असा आदेशही न्यायालयाने दिला