माजी आमदार संजय कदम यांची ठाकरे गटातून हकालपट्टी

रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदेसेनेने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उद्धवसेनेची घरघर थांबायची चिन्हे नाहीत. याठिकाणचे माजी आमदार संजय कदम हे शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत याची चाहुल लागताच उद्धव ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्या सहीचं पत्र उद्धवसेनेकडून जारी करण्यात आलं आहे. या पत्रात म्हटलंय की, रत्नागिरी(खेड, गुहागर, दापोली, मंडणगड) याठिकाणचे जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे असं सांगितले आहे.

दापोलीचे माजी आमदार संजय कदम शिंदेसेनेच्या वाटवर आहेत. जर त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश झाला तर उद्धवसेनेला जिल्ह्यात पहिल्यापासून सुरुवात करुन पक्षबांधणी करावी लागेल. विधानसभा निवडणुकीनंतर माजी आम . राजन साळवी, माजी आम . सुभाष बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक आणि पराग बने, दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके, दापोली नगर पंचायतीमधील नगरसेवक या सर्वांचे पक्ष सोडणे उद्धवसेनेसाठी मोठे धक्के आहेत.