कोकणातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी नवी मानके
रत्नागिरी:- कोकणात व विशेषकरून रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडतो तरीही येथे पाणीटंचाई लवकर निर्माण होते. पाणीटंचाई दूर करण्याबरोबरच येणाऱ्या काळात कोकणात पायाभूत सुविधा निर्माण करून कोकणातील प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी कृती कार्यक्रम राबविला जाईल. तर सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये नवीन तंत्रज्ञान आणू. सायबर गुन्ह्यांची तात्काळ उकल करण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमीपूजन व पोलीस वसाहतीचे भूमीपूजन ना.फडणवीस यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना.उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण, खासदार सुनिल तटकरे, आमदार योगेश कदम, सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत, माजी आमदार हुस्नबानू खलफे, प्रमोद जठार, बाळासाहेब माने, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस गृहनिर्माणच्या अधिक्षक अभियंता अनिता परदेशी, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्यासह विविध खात्यांचे शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
रत्नागिरीत आल्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ज्या कोठडीत ब्रिटिशांनी बंद केले होते त्या कोठडीला आपण भेट दिली. युती शासनाने रत्नागिरी विशेष कारागृहाच्या मजबुतीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला . त्या कामाचे भूमीपूजन आपल्या हस्ते झाले. स्वा. सावरकर यांनी क्रांतीकारकांना प्रेरणा दिली. त्यांच्या प्रेरणेतून अनेक क्रांतीकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वा.सावरकर हे दिशा व ऊर्जा देणारे होते. जातीभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही सर्वांना दिशादर्शक ठरत आहेत असेही ना.फडणवीस यांनी सांगितले.
मागील अडीच वर्षात केवळ आश्वासनेच मिळाली. निधी मिळाला नाही हे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. निधी मिळत नसल्याने अखेर ते आमच्या सोबत आले. आमच्यासोबत आल्यानंतर त्यांनी जो शब्द टाकला तो शब्द आम्ही पूर्ण केला. 24 तास जनतेसाठी सेवा करणाऱ्या पोलीस अंमलदारांची अनेक ठिकाणची निवासस्थाने शिवकालीन तर काही ठिकाणी ब्रिटिशकालीन आहेत. पोलिसांनीही उत्तम दर्जाच्या वसाहतीत रहावे यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून देत प्रत्यक्षात कामाला सुरूवात केली आहे. येत्या दोन वर्षात रत्नागिरीतील पोलीस कर्मचाऱ्यांना सुविधायुक्त निवासस्थाने उपलब्ध होतील असेही ना.फडणवीस म्हणाले.
भारतीयांवर राज्य करण्यासाठी ब्रिटिशांनी कायदे तयार केले होते. या कायद्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बदल केला आहे. तीन नवे कायदे हे जनतेचे कायदे म्हणून यापुढे कार्यान्वित होणार आहेत. नागरी सुरक्षा कायदा, नागरी साक्ष कायदा निर्माण करतानाच यापुढे तांत्रिक पुरावे न्यायालयात ग्राह्य मानले जाणार आहेत. त्यामुळे साक्षीदार फुटून न्यायदानात होणारा अडथळा दूर होणार आहे. आज तंत्रज्ञान विकसित होत असताना सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी सर्व बँकांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणून सायबर गुन्ह्यातील फसवणूक रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी एलएनटीसोबत करार करण्यात आले असून ते नवी टेक्नॉलॉजी विकसित करीत असल्याचे ना.फडणवीस यांनी सांगितले.
पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी काजू बागायदारांना प्रतिकिलो 10 रुपयांची नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने आर्थिक तरतूद केली आहे. तर पोलीसपाटील, आशा स्वयंसेविका यांच्या पाठिशी उभे राहण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केले आहे. आता जबाबदारी तुमची आहे असे सांगितले.