चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील मांडकी गावचे सुपुत्र प्रथमेश अरविंद राजेशिर्के यांनी दिल्ली येथे झालेल्या २०२० च्या युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होत रत्नागिरी जिल्ह्यातून पहिला आयएएस अधिकारी म्हणून निवड होण्याचा मान पटकावला आहे.
प्रथमेश यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण डेरवण येथील वालावलकर हायस्कूलमध्ये झाले. यानंत त्याने वालचंद कॉलेज सांगली येथून इजिनिअरिंगची पदवी घेतली. एक वर्ष नोकरी करून साठविलेल्या पैशातून त्याने पुणे व दिल्ली येथे राहून तीन वर्षे युपीएससीचा अभ्यास केला. प्रथमेशचे वडील अरविंद बापूसाहेब राजेशिर्के हे भारतीय सैन्यात मेजर होते. गेल्या मे महिन्यात त्यांचे निधन झाले. त्याचे आजोबा ब्रिटिशांच्या काळात शासकीय सेवेत होते. लहानपणापासून युपीएससी परीक्षेत यश मिळवायचे, असा प्रथमेशचा ध्यास होता. त्याला वडिलांचे, मावसभाऊ उमेश राजेशिर्के, बहिणी यांचे मार्गदर्शन लाभले.