गुहागर:- फिरायला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पलायन करणाऱ्या नरवण येथील चोरट्याला गुहागर पोलिसांनी अवघ्या 2 तासात पकडून गजाआड केले. ही चोरीची घटना शनिवारी सायंकाळी जामसूत येथे घडली होती.
जामसूत दत्तवाडी येथील प्रेमलता साळवी (70) ही वृध्द महिला 11 मार्च रोजी सायंकाळी 5 वा. जामसूत पेप्याजवळ बोऱ्या रस्त्यावर फिरत होती. दरम्यान, 5.15 च्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या एका मोटारसायकलस्वाराने साळवी यांच्या गळ्यातील सोन्याची माळ (अंदाजे किंमत 65 हजार) खेचून पलायन केले. या चोरीची फिर्याद येथील पोलीस ठाण्यात तत्काळ देण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते हे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जामसूत व पिंपर गावातील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज व ग्रामस्थांकडून माहिती घेऊन जलदगतीने तपास सुरु केला. सीसीटीव्हीत दिसणारा चोर काळ्या रंगाची गाडी, तोंडाला मास्क व टोपी घातलेला आढळला. कसून चौकशी करत माळ खेचणारा चोरटा नरवण पंधरवणे येथून ताब्यात घेण्यात आला. प्रशांत नंदकुमार पाटेकर (34) असे या संशयित चोरट्याचे नाव आहे. या चोरट्यावर भा.दं.वि. कलम 392 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. चोरीचा तपास 2 तासात लावणाऱ्या गुहागर पोलिसांच्या या टीममध्ये पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, हेडकॉन्स्टेबल स्वप्नील शिवलकर, हनुमंत नलावडे, लुकमान तडवी, वैभवकुमार चौगुले, प्रितेश रहाटे, उदय मोनये, अमोल गायकवाड यांनी सहभाग घेतला होता.