महावितरणच्या 90 हजार ग्राहकांनी थकवले 24 कोटी 85 लाख

रत्नागिरी:- महावितरण कंपनीची वीजबिल थकबाकी काही कमी होण्याचे नाव घेईना. गेल्या महिन्यापर्यंत जिल्ह्यातील ९० हजार ७२६ ग्राहकांनी २४ कोटी ८५ लाख रुपयाला महावितरणला थकवले आहे. यामध्ये सर्वांत जास्त साडेनऊ कोटी ही पथदिव्यांची तर त्या खालोखाल घरगुती ग्राहकांची ६ कोटी ४० लाखाची थकबाकी आहे. वसुलीसाठी महावितरणने कठोर पावले उचलली असून जुन्या थकबाकीदारांच्या जोडण्या तोडल्या आहेत. 

कोरोना काळामध्ये मोठ्या आर्थिक संकटात असलेली महावितरण कंपनी दीड-पावणेदोन वर्षांचा कालावधी लोटला तरी अजून काही सावरलेली नाही; मात्र कारवाईचा बडगा उगारल्यानंतर वसुलीमध्ये वाढ झालेली दिसत आहे. महावितरण कंपनीची राज्यात सुमारे १६ हजार कोटीच्यावर वर थकबाकी आहे. कंपनीला सावरण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाकडुन काही कठोर निर्णय घेतले. महावितरण कंपनीने ग्राहकांना संधी देऊनही पाहिले तरी अनेक ग्राहकांकडून त्याकडे कानाडोळा केला जात आहे. यापूर्वी ६२ कोटींच्यावर असलेली जिल्ह्याची थकबाकी दोन महिन्यांपूर्वी ५२ कोटी ३९ लाखापर्यंत होती. ती आता काही प्रमाणात कमी झाली आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्यामध्ये हीच थकबाकी २४ कोटी ८५ लाखवर गेली आहे. ९० हजार ७२६ ग्राहकांकडून ही थकबाकी वसूल होणे बाकी आहे. यापूर्वी दीर्घकाळ बिल न भरणाऱ्या जिल्ह्यातील ९३६ ग्राहकांचे तात्पुरते वीजकनेक्नशन तोडण्यात आले आहे. ही कारवाई आजही सुरू आहे.
जिल्हा वीजबिल थकबाकीमध्ये घरगुती ७१ हजार १३७ ग्राहकांकडून ६ कोटी ४० लाख रुपये थकबाकी आहे. वाणिज्य ८ हजार ६६८ ग्राहकांकडून ३ कोटी २९ लाख, औद्योगिक १ हजार ३५९ ग्राहकांचे १ कोटी ५९ लाख, पथदिव्याचे १ हजार ४२५ जणांचे ९ कोटी ५४ लाख,  पाणीपुरवठा ९०५ ग्राहकांचे १ कोटी ९५ लाख, कृषीच्या ४ हजार २२४ ग्राहकांचे ८६ लाख, तर सार्वजनिक सेवेतील १ हजार ९९८ ग्राहकांचे १ कोटी २२ लाख असे एकूण ९० हजार ७२६ ग्राहकांचे २४ कोटी ८५ हजार रुपये एवढी महावितरणची थकबाकी आहे.