कर्मचाऱ्यांची कसरत ; विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात यश
रत्नागिरी:- यंदाच्या पावसामध्ये जून व जुलै महिन्यातील वादळवारे, अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात महावितरण कंपनीचे २ कोटी ४५ लाख आर्थिक नुकसान झाले. त्यात विद्युतयंत्रणेतील उच्च दाबाचे १८४ वीजखांब, लघुदाब ४४२ वीजखांब आणि ९ वितरण रोहित्रांचे नुकसान झाले; मात्र भरपावसातही अनेक दुर्गम भागात मोठ्या धाडसाने आणि शर्थीच्या प्रयत्नामुळे पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
जिल्ह्यात यंदाचा पावसाळी हंगाम तसा लांबल्याने जून महिना कोरडा गेला; परंतु जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने जोरदार सुरवात केली. २० तारखेनंतर तर दोन आठवडे जोरदार पाऊस बरसला. यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी दरड कोसळली. रस्ते, महामार्ग खचला. जिल्ह्यातील वाशिष्ठी, जगबुडी, अर्जुना, कोदवली, काजळी नदी आदींना मोठा पूर आला. अनेक गावांचा संपर्क तुटला होता. या सर्व नैसर्गिक आपत्तीमध्ये महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे व झाडांच्या फांद्या वीजवाहिनीवर तुटून पडल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी ३७ वीजखांब उन्मळून पडले होते. त्यामुळे १९ गावातील ९६ ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित आहे. त्यात संगमेश्वर उपविभागातील धामणी सोनारवाडी गावातील ४४ ग्राहक, राजापूर उपविभागातील गोठीवरे गावातील १० ग्राहकांचा समावेश आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत त्यांचा विद्युत पुरवठा लगेच सुरळीत केला.
खेडमध्ये जगबुडीच्या पुरामुळे विद्युतखांब कोलमडून मुख्य विद्युतवाहिनी तुटली होती. त्यामुळे अनेक गावे अंधारात होती; परंतु महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पावसात आणि पुरात विश्रांती न घेता आणि पूर ओसरण्याची वाट न पाहता एनडीआरएफच्या टीमची मदत घेऊन पुराच्या पाण्यातून नदीपलिकडे मुख्य वाहिनी जोडली होती. अनेक ठिकाणची अतिशय दुर्गम भागातील रोहित्रे खराब झाली होती, जेथे रस्ता नव्हता तरी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खांद्यांनी आणि ओढत नेऊन ही रोहित्र बसवली होती.