अंजणारीतील घटना; प्रवाशांनी केला व्हीडीओ
रत्नागिरी:- कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते, तर शिकारीवरही काही अंशी आळा बसला आहे. त्यामुळे वन्यपशू बिनधास्तपणे वावरू लागले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी येथे गवारेड्यांचा कळप रस्त्याच्या जवळ येऊन निर्धास्तपणे चरताना पहायला मिळाला. रस्त्यावरुन जाणार्या प्रवाशांनी कळप पाहील्यानंतर व्हीडीओ तयार केला. जवळच्या जंगलातून गवारेडे आले असावेत अशी शक्यता वर्तविली जात असून वनविभागाकडून त्याची तत्काळ दखल घेण्यात आली आहे.
गवारेडा हा प्राणी स्वतःहून हल्ला करत नाहीत, मात्र तो तेवढाच ताकदवान असतो. संगमेश्वर, लांजा येथील जंगल परिसरात गेल्या चार ते पाच वर्षात गवारेड्याचे दर्शन होऊ लागले आहे. संगमेश्वरात अगदी लोकवस्तीजवळच गव्याचे दर्शन झाले होते. संगमेश्वरमध्ये अनेकवेळा गव्याने शेतीचे नुकसान केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. हा प्राणी कळपाने राहत असला तरीही मोकळ्या जागेत झुंडीने त्यांचे दर्शन होत नाही. एखादा गवा पाहिल्याचे अनेकांकडून सांगितले जात आहे. कोरोनामुळे सध्या महामार्गांवरील वाहतूकीचे प्रमाण कमी झालेले आहे. गावागावातून जंगल भागात शिकारीसाठी जाणार्यांचेही प्रमाण कमी झाल्याने वन्यप्राणी कुठेही आढळून येत आहेत. अंजणारी नदीच्या जवळच जंगली भाग आहे. तेथील या गव्यांचा कळप अन्नाचा शोध घेत महामार्गाच्या शेजारी आले होते. अंजणारी येथे चौपदरीकरणाच्या कामामुळे करण्यात आलेल्या कटींगवर हा कळ पहायला मिळाला. शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी सुमारे सोळा गवे होते. त्यांचा व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर टाकण्यात आला. ही बाब वन विभागाला समजल्यानंतर सायंकाळी उशिरा अंजणारी येथे पथक दाखल झाले.
त्यांना तत्काळ पकडणे अशक्य असल्यामुळे आजुबाजूच्या लोकांना काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात कोकणात भातशेती केली जाते. या शेतांचे गवारेडा नुकसान करतो. हा प्राणी एकाच ठिकाणी थांबत नाही. तो पुढे पुढे प्रवास करत राहतो. त्यामुळे त्याच्या पासून लोकांना धोका नसल्याचे वन विभागाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले. या परिसरातील शेतीचे नुकसान केले तर शासनाच्या निकषानुसार शेतकर्यांना भरपाई दिली जाईल असे आवाहन वनविभागाकडून केले आहे.