भाजपकडून भागोजी शेठ कीर यांचे कार्य नष्ट करण्याचा प्रयत्न: कुमार शेट्ये 

रत्नागिरी:- भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रत्नागिरीतील प्रसिध्द पतितपावन मंदिराविषयी वादग्रस्त ट्विट करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी बांधलेल्या या मंदिराचा उल्लेख करण्याऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बांधलेल्या पतितपावन मंदिरात जावून मूर्तीपूजा केली असा उल्लेख केला. त्यामुळे भागोजीशेठ कीर यांचे कार्य नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माफी मागावी अन्यथा रत्नागिरीत फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांनी दिला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी 25 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी दौरा केला. आपल्या या रत्नागिरी दौयात त्यांनी शहरातील पतित पावन मंदिराला भेट दिली. यानंतर चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं होतं, या ट्विटवरून सध्या रत्नागिरीकर आक्रमक झाले आहे. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेला कुमार शेट्ये यांच्यासह काँग्रेसचे हारिस शेकासन, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मिलींद कीर, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, काँग्रेसच्या रुपाली सावंत, रमेश शहा आदींची उपस्थिती होती.

चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा रत्नागिरीत फिरू देणार नसल्याची भूमिका उपस्थिती सर्वांनीच घेतली आहे. यावेळी चित्रा वाघ यांच्या वादग्रस्त ट्विटचा निषेध करण्यात आला. त्यांनी स्वातंत्र्याचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न रत्नागिरीत येवून केला आहे. ट्विटवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या पतितपावन मंदिरात जावून मूर्ती पूजा केली, अशा आशयाचे धांदात खोटे ट्विट केलेले आहे. दानशूर भक्तीभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चाने देशवीर सावरकर यांनी केलेल्या विनंतीवरून हे पतितपावन मंदिर बांधून हिंदू धर्मियांना खुले केले आणि भागेश्वर चरणी अर्पण केले असे कुमार शेट्येंसह उपस्थितांनी सांगितले. अशा आशयाचा शिलालेख पतितपावन मंदिराच्या प्रवेद्वारावर लिहिला गेला असतानासुध्दा हा खरा इतिहास न वाचता चित्रा वाघ यांनी व त्यांच्या पक्षाने दिलेला होमवर्क ट्टिरवरून मांडला आणि स्वतःच्या अज्ञाानाची मुक्ताफळे उधळली असल्याचे शेट्ये यांनी सांगितले.

चित्रा वाघ यांनी इतिहासाची मोडतोड करून खोटा इतिहास पसरवून लोकांच्या भावना दुखविण्याचे काम केले आहे. त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा आम्ही घेतल्याचे कुमार शेट्ये यांनी सांगितले. भागोजीशेठ कीर यांचे कार्य हे महान असून त्यांची तुलना कुठेही आणि कुणाशीही होवू शकत नाही. त्यामुळे भागोजीशेठ कीर यांचे कार्य नष्ट करून सावरकरजींच्या नावावर खपवू नये असे कुमार शेट्ये, हारीस शेकासन यांनी ठणकावले आहे. कोणतेही विधान करताना त्याचा पूर्वइतिहास बघूनच इतिहास सांगावा, अन्यथा नाईलाजाने त्यांना त्यांची जागा दाखवून देउ असा इशारा कुमार शेट्ये यांनी दिला आहे.