संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर जवळच्या रामकुंड वळणावर आरवलीकडे जाणाऱ्या डंपर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने डंपर विद्युत पोलला जाऊन धडकला. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेला डंपर चालकाचा मृत्यू झाला आहे.
अपघातामध्ये विद्युत पोलचेही नुकसान झाले आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री 2 वाजण्याच्या दरम्यान घडला. हा डंपर चालक गोव्याहून मुंबईला जात होता. तो संगमेश्वर जवळच्या रामकुंड वळणावर आला असता त्याचा भरधाव वाहनावरील ताबा सुटल्याने डंपर चालक विद्युतभारित पोलला जाऊन धडकला.
त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. अपघाताची खबर मिळताच त्याला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सदरच्या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास संगमेश्वर पोलीस नाईक प्रशांत शिंदे करत आहेत. या अपघातानंतर रामपेठ येथील विद्युत पुरवठा खंडित झाला असून महावितरण कडून त्वरित याची दुरुस्ती करण्यात येत आहे.