रत्नागिरी:- तहसीलदार असल्याचे सांगून रत्नागिरी शहरातील विधवा महिलेस सांगलीतील सराईत गुन्हेगाराने १२ लाखांचा गंडा घातला. विविध आमिषे दाखवून महिलेची फसवणूक केली. या प्रकरणी शहर पोलिसांच्या पथकाने संशयिताचा शोध घेऊन अटक केली. प्रकाश कल्लेशा पाटील (रा. सांगली) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर सांगली, सातारा, कोल्हापूर पोलिस ठाण्यात १० ते १२ गुन्हे दाखल आहेत.
शहरातील विधवा महिलेशी तोतया तहसीलदाराने मधुकर दोरकर या नावाने भावनिक पत्रव्यवहार केला. त्यानंतर संशयित आणि त्या महिलेची ओळख वाढत गेली. आपण तहसीलदार म्हणून शासकीय सेवेत आहे, अशी बतावणी करून ३ फेब्रुवारी २०२० ते ३१ जुलै २०२० या कालावधीत अनेक आमिषे दाखवून वेगवेगळ्या कारणांसाठी महिलेकडून १२ लाख पाच हजार ५०० रुपये घेऊन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने या संदर्भात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुरू असताना संशयिताचा फोटो निष्पन्न झाला. त्यावरून गुप्त खबऱ्याकडून शोध सुरू झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे पथक तयार करण्यात आले. पथकाने सांगली येथे जाऊन माहिती काढली. त्यानुसार संशयित आरोपी प्रकाश कल्लेशा पाटील ऊर्फ मधुकर दोरकर याच्या घरी स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. या वेळी संशयित दोरकर मिळून आला. चौकशीत त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविल्यावर मात्र त्याने कबुली दिली.
३ फेब्रुवारी २०२० ते ३१ जुलै २०२० या कालावधीत तहसीलदार असल्याचे सांगून मधुकर दोरकर या खोट्या नावाने त्या महिलेची १२ लाख पाच हजार ५०० रकमेची फसवणूक केल्याची कबुली त्याने दिली. त्याने आपले नाव प्रकाश कल्लेशा पाटील (वय ४०, रा. फ्लॅट नं. २५, वसंतनगर, गणपती मंदिराजवळ, ता. मिरज, जि. सांगली) असे सांगितले. संशयिताचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला.
पुढील चौकशीसाठी त्याला रत्नागिरीतील गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. या संशयितावर कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी साधारण १० ते १२ गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. पोलिस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रायसिंग पाटील, सहायक निरीक्षक मनोज भोसले, पोलिस नाईक प्रसाद घोसाळे, राहुल घोरपडे, योगेश नार्वेकर, संकेत महाडिक, राहुल देशमुख, रमीज शेख यांनी कामगिरी केली.