सलग सुट्ट्यांचा परिणाम; मोठी आर्थिक उलाढाल
रत्नागिरी:- मंदिरांचे दरवाजे उघडल्यानंतर कोरोनामुळे ठप्प झालेला पर्यटन व्यावसाय पुर्वपदावर येत आहे. प्रसिध्द गणपतीपुळे पर्यटनस्थळाला आतापर्यंत 65 हजाराहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. जोडून सुट्ट्या आल्याने या आठवड्यात पर्यटकांची संख्या वाढली. त्यामध्ये निवास करणार्या पर्यटकांचा टक्का 50 टक्केवर पोचला आहे; मात्र लॉकडाऊनच्या भितीने कोकणच्या जवळपास असलेले जिल्हा वगळत अन्य भागातून येणार्या पर्यटकांचा टक्का वाढलेला नाही.
राज्य शासनाने दिवाळी पाडव्याच्या दिवशी मंदिरांचे दरवाजे उघडले आणि पर्यटकांची फिरण्याची वाट मोकळी झाली. यापुर्वी कोकणातील अर्थव्यवस्था आंबा, मासळीवर अवलंबून होती; मात्र त्या पर्यटन व्यावसायाची भर पडली आहे. समुद्रकिनारे, मंदिरे या ठिकाणी पर्यटकांचा राबता वाढला असून दरवर्षी दहा लाख पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यात येऊन जातात. त्यातून काही कोटींची उलाढाल होते. कोरोनामुळे मे महिन्यासह गणपती, दिवाळींचा हंगाम वाया गेला. करोडो रुपयांचा फटका लॉजिंग, हॉटेल व्यावसायिकांसह छोट्या-मोठ्या फेरीवाल्यांना बसला. 16 नोव्हेंबरला मंदिर उघडल्यानंतर पुढील पंधरा दिवसात पर्यटकांची पावले आपसूकच घराबाहेर पडली. पहिले दोन ते तीन दिवस कमी प्रतिसाद होता. गणपतीपुळे सारख्या परिसरात श्रींचे दर्शन आणि किनार्यांवर फिरण्याच्या उद्देशाने कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरातील लोकांचा कल अधिक होता. दापोली, गुहागरमध्ये मुंबई, पुण्यातील लोकांची गर्दी दिसत होती. बहूतांश वर्ग हा खासगी गाड्यांमधूनच येत आहे. गणपतीपुळेमध्ये गेल्या पंधरा दिवसात 65 हजार पर्यटकांनी हजेरी लावली. शनिवार, रविवार आणि सोमवारी (ता. 30) गुरु नानक जयंतीची जोडून सुट्टी आल्यामुळे किनार्यावर गर्दी अधिक होती.
पहिल्या पंधरवड्यात गणपतीपुळेत येणार्या पर्यटकांकडून राहण्यासाठी प्रतिसाद कमी होता. एक दिवसांचे पर्यटन होत होते; मात्र सध्या 50 टक्के पर्यटक राहू लागल्यामुळे लॉजिंग व्यावसायीकांची स्थिती चांगली आहे. शाळा, महाविद्यालये सुरु झाली असली तरीही कोरोनामुळे अनेकजण अजूनही ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. सध्या राज्यशासनाकडून दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली असून मार्केटमध्ये लॉकडाऊनची अफवा पसरली आहे. मुंबई, पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. लॉकडाऊनच्या अफवेने अनेकजणं बाहेर पडण्यास तयार नाहीत. त्याचा परिणाम पर्यटन व्यावसायावर होत आहे. ख्रिसमसच्या सुट्टीत त्यात मोठी वाढ होणार आहे. या कालावधीत परदेशी पर्यटनासाठी न जाणारे कोकणाकडे वळण्याची शक्यता आहे.