बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या रत्नागिरीतील महिलेला अटक

रत्नागिरी:- कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातून महिलेच्या गळ्यातील चेन चोरणाऱ्या महिलेस शाहूपुरी पोलिसांनी आज अटक केली. अनघा अनंत जोशी (वय ६२ रा. बसेरा शिवाजीनगर, रत्नागिरी, सध्या जाधववाडी कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. 

तिच्याकडून कराड, कोल्हापुरातील दोन ठिकाणच्या चोऱ्या उघडकीस आल्या. ती पोलिस रेकॉर्डवरील असून, तिने सांगली, रत्नागिरी, देवरुख, शिरोळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी सोन्याचे दागिने चोरीचे एकूण १० गुन्हे दाखल आहेत. 

शाहूपुरी पोलिसांनी सांगितले की, एक मे रोजी वैशाली बल्लाप्या कोटगी या मुलीसह मध्यवर्ती बस स्थानकात आल्या होत्या. गडहिंग्लज येथे मुळे गावी जाण्यासाठी बसमध्ये चढताना त्यांचे गळ्यातील १२.५० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसडा मारून लंपास केली होती. याची फिर्याद त्यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. हा गुन्हा रेकॉर्डवरील महिला आरोपीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अंमलदार मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, लखनसिंह पाटील यांनी महिलेचे नाव शोधले आणि तिचा शोध घेण्यासाठी गुन्हे शोध पथकाचे अंमलदार व महिला पोलिस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांनी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात वेशांतर करून सापळा लावला होता. जोशी मध्यवर्ती बसस्थानकात आल्यानंतर तिला ताब्यात घेतले. सखोल तपास केला असता तिने चोरीची कबुली दिली. 

२ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त

काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक व कराड (जि. सातारा) मध्यवर्ती बस स्थानक येथे महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरल्याचे कबुली अनघा जोशीने दिली आहे. तिच्याकडे गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमालात सोन्याची चेन १२.५० ग्रॅम व सोन्याची माळ १३.०० ग्रॅम असा एकूण २ तोळे ०५.५० ग्रॅम असा सुमारे २ लाख ३० हजार रुपये मुद्देमाल जप्त केल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.