बँकेची 25 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

रत्नागिरी:- बँकेची तब्बल 25 लाख 25 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना बनावट खरेदी खत करण्यास मदत करणाऱ्या अन्य 4 जणांसह एकूण 6 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना 18 मे ते 23 मे 2023 या कालावधीत घडली आहे.

लिंगराज लकाप्पा जाधव (49), उत्तरेश्वर मनोहर मुंढे (63), उद्धव तुकाराम मुंढे (71), नजीर मिरासाहेब बारगीर (77), अल्ताब गुलाब शेख आणि सुदर्शन धनचंद्र चौगुले (सर्व रा. कोल्हापूर ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 6 संशयितांची नावे आहेत.त्यांच्या विरोधात मनोहर मारुती पाटील (39, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी ) यांनी 4 ऑगस्ट रोजी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार,लिंगराजने ग्रामीण बँकेतून 16 लाख 40 हजार रुपये कर्ज घेऊन कुवारबाव येथील मयुरेश रेसिडेन्सीमध्ये दोन सदनिका खरेदी केल्या. त्याबाबतचे खरेदीखत रत्नागिरीतील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवले. परंतू हा दस्तऐवज बँकेत जमा केला नाही. तसेच कर्जाची परतफेड न करता दोन्ही सदनिका उत्तरेश्वर मुंढेला बँकेचे 25 लाख 25 हजार बाकी असताना या सदनिकांवर कसलाही बोजा नसल्याचे दाखवून खोटे खरेदीखत अन्य 4 जणांच्या मदतीने तयार करून दिल्या.या प्रकरणात संगनमताने बँकेची फसवणूक तसेच खोटे खरेदीखत करण्यास मदत केल्याप्रकरणी एकूण जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्या विरोधात भादंवी कायदा कलम 420,468,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.