बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप रत्नागिरीत यशस्वी झाल्याचा दावा

रत्नागिरी:- सर्वस्तरांवरील नोकरभरती झाली पाहिजे आणि संघटनांबरोबर द्विपक्ष बोलणी त्वरित चालू करा, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सर्व कर्मचारी व अधिकारी यांचा आजचा संप यशस्वी झाल्याचा दावा बँक संघटना प्रतिनिधींनी केला. शुक्रवारी (ता. २७) बँक ऑफ महाराष्ट्रच्या गाडीतळ येथील रत्नागिरी शहर शाखेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी महाबँक व्यवस्थापनाविरोधात तीव्र निदर्शने केली.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकर भरतीच्या प्रमुख प्रश्नावरुन सर्व कर्मचारी व अधिकारी यांच्या बँकेतील सर्व संघटनांनी एकत्रितपणे आज बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये देशव्यापी संप पुकारला होता. गेल्या १० वर्षांत बँकेचा व्यवसाय २५० टक्के पटींनी वाढला आहे, ४५० नवीन शाखा उघडण्यात आल्या आहेत तर कर्मचार्‍यांची संख्या मात्र २० टक्क्यांनी कमी झाली आहे. बँक गेल्या अनेक वर्षांपासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा यांमुळे रिक्त झालेल्या जागा देखील भरत नाही. परिणामी लोकांना रोज जास्त वेळ काम करावे लागते, सुट्टीच्या दिवशी देखील कामावर यावे लागते, आवश्यकतेनुसार सुध्दा सुट्टी घेता येत नाही. यामुळे कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडणे अशक्य झाले आहे. या सगळ्याचा परिणाम कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रकृतीवर झाला आहे. त्यांचे कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. याशिवाय अपुर्‍या कर्मचारी संख्येमुळे समाधानकारक ग्राहक सेवा देता येणे अशक्य झाले आहे. याचा बँकेच्या व्यवसायावर परिणाम होतो आहे. महाबँकेतील कर्मचारी व अधिकारी विलक्षण तणावातून जात आहेत. संसदेने मंजूर केलेले ट्रेड युनियन अ‍ॅक्ट व औद्योगिक कलह कायद्यांतर्गत असलेल्या तरतुदींचे पालनही बँक व्यवस्थापन करावयास तयार नाही. या प्रश्नांवर महाबँकेतील सर्व संघटनांनी वारंवार तक्रार मांडली. पण व्यवस्थापनाकडून काहीच प्रतिसाद येत नाही. नाईलाजाने शेवटचा मार्ग म्हणून संपाची हाक दिली. यानंतर डेप्युटी चीफ लेबर कमिशनर यांनी तडजोडीसाठी १८ जानेवारी, २४ जानेवारी व २५ जानेवारीला कन्सिलिएशन मिटींग घेतली; परंतु व्यवस्थापनाच्या आडमुठेपणामुळे कुठलीही तडजोड घडून आली नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून व्यवस्थापन व संघटना यांच्यामध्ये २६ जानेवारीला पुन्हा एकदा मिटींग झाली; परंतु पुन्हा एकदा व्यवस्थापनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे हा संप करण्यात आल्याचे बँक प्रतिनिधींनी सांगितले. या संपामुळे ग्राहकांच्या होणार्‍या गैरसोयीबद्दल संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच उत्तम ग्राहक सेवेची गरज म्हणून नोकरभरती या मागणीला ग्राहकांनी पाठिंबा द्यावा.