फुणगूस-डिंगणी भागातील भरवस्तीत बिबट्याचा संचार

संगमेश्वर:- फुणगूस खाडीभागात भक्ष्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या बिबट्याचे दर्शन वाहनचालकांसह अनेकांना होऊ लागल्याने लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. सैरावैरा फिरणाऱ्या या बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाने वेळीच करावा, अशी जनतेतून मागणी केली जात आहे.

दोन दिवसांपूर्वी फुणगूस येथील प्रतिष्ठित व्यापारी प्रशांत उर्फ नाण्या थुल हे रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद करून थुल वाडी येथील आपल्या घरी चारचाकी वाहनाने जात असताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी त्यांच्या वाहनापासून काही अंतरावर वाघ दिसून आला. मात्र त्यांनी जाग्यावरच गाडी थांबवली व वाघ तेथून जंगलाच्या ठिकाणी मार्गस्थ झाल्यानंतर त्यांनी घरचा मार्ग पत्करला. मात्र अचानक त्यांच्या समोर वाघ आल्याने नाण्या थुल यांची हबेळहंडी मात्र उडाली होती.

डिंगणी-फुणगूस पुलाचा वापरही अलीकडे पलीकडे जाण्यासाठी बिबट्या करू लागले आहेत असे समजण्यास हरकत नाही. या पूर्वी काही वाहनचालकांना पुलावरही बिबट्या दिसून आल्याचे सांगितले जात आहे. तर चार दिवसापूर्वीच घटना आहे कराड धामणी येथील मोहमद मुल्ला हे फुणगूस येथे वास्तव्यास असून ते डिंगणी येथे नमाजासाठी गेले असता, नमाज पठण करून येत असताना डिंगणी येथील पुलाच्या एप्रोज रस्त्यावरच त्यांना वाघ दिसला. मुल्ला हे या रात्रीच्या वेळी एकटेच असल्याने त्यांची बोबडीच वळली होती. आता आपले काही खरे नाही असे म्हणत त्यांनी परमेश्वराचा जप सुरू केला व कोणतीही हालचाल न करता जाग्यावरच काही वेळ उभे राहिले व वाघ तेथून गेल्यानंतर त्यांनी सुटकेचा श्वास सोडत पुलावर उभ्या असलेल्या त्यांच्या गाडीत बसून लागलीच घराची वाट धरली.

पोटाची भूक भागवण्यासाठी व जनावरांच्या रक्ताला चौटाळलेल्या वाघाने भक्ष्यशोधार्थ आपला मोर्चा जंगलभागातून लोकवस्तीकडे वळवला आल्याने वाहन चालक तसेच काही लोकांना त्याचे दर्शन होऊ लागले असून सर्वत्र वाघाची दहशत निर्माण झाली आहे. डिंगणी-फुणगूस पुलावर तसेच मुख्य व गावातील अंतर्गत रस्त्यावरही वाघ दिसून येत असल्याने रात्रीच्या वेळी या मार्गावरून येणाऱ्या वाहन चालकांच्याही मनात भीती निर्माण झाली आहे. काहींनी या मार्गावरून प्रवास करणे टाळले आहे. तरी वनविभागाने दहशत माजवणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.