प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक मंडळ निवडणुकीसाठी 32 उमेदवार रिंगणात

रत्नागिरी:- जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक मंडळाच्या 16 जागांसाठी 32 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीचा प्रचार अधिक जोमाने सुरू असून डमी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने सरळ लढतीचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपली आहे. दि.4 नोव्हेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार असून दि.5 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महायुतीतर्फे जिल्हा राखीव, तालुका मतदारसंघातून 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांची निशाणी ‘टेबल’ आहे.

महायुती पॅनेलमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख सभा, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य उर्दू संघटना यांचा समावेश आहे. प्रचाराच्या कालावधीत राज्य शासनामार्फत घेतलेले खाजगीकरण, कंत्राटीकरणाचे धोरण, शिक्षकांवर लादले जात असलेले अशैक्षणिक उपक्रम, जुनी पेंशन योजना लागू करणे आदी विषयांचा समावेश आहे. प्रमुख मागण्यांसाठी नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात शिक्षकांच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. महायुती उमेदवारांच्या ‘टेबल’ निशाणीवर अमुल्य मदत देऊन त्यांना विजयी करावे असे आवाहन सर्वसंघटनांमार्फत करण्यात आले आहे.
महायुतीमार्फत तालुका मतदारसंघातून मंडणगड-सचिन चांदिवडे, दापोली-अशोक मळेकर, खेड-शरद भोसले, चिपळूण-अमोल भोबसकर, गुहागर-नरेंद्र देवळेकर, संगमेश्वर-रमेश गोताड, रत्नागिरी -प्रवीण देसाई, लांजा-संजय डांगे, राजापूर-विजय खांडेकर, जिल्हा राखीव मतदारसंघातून खेडचे सुनिल दळवी, देवरूखचे नरेश सावंत, इतर मागास प्रवर्गातून लांजाचे उमेश केसरकर, अनुसुचित जाती-जमाती मतदारसंघातून चिपळूणचे मनोज म्हस्के, भटक्या जाती-जमाती मतदारसंघातून देवरूखचे मुकुंद वाजे, महिला राखीव मतदारसंघातून राजापुरच्या प्रांजली धामापूरकर, रत्नागिरीच्या नाझिमा मालिम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर महायुतीमार्फत प्रत्येक तालुक्यात जाहीर प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे.