लांजा:- स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास तालुक्यातील प्रभानवल्ली कुंभारवाडी येथे घडली आहे. या घटनेत एक ५२ वर्षीय व्यक्ती ९२ टक्के भाजली आहे.
याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील प्रभानवल्ली कुंभारवाडी येथील मारुती गुणाजी म्हेतर (५२ वर्षे) हे आपल्या घरात एकटेच राहत होते. त्यांचा एक भाऊ कामानिमित्त पालघर येथे राहतो. मारुती म्हेतर यांचे गेल्या काही वर्षांपासून मानसिक संतुलन बिघडले होते. त्यांनी शुक्रवारी सकाळी ८.३० च्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून घेवून घरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ते ९२ टक्के भाजले. त्यानंतर त्यांना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची लांजा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.