प्रदूषण प्रकरणी रत्नागिरी नगर परिषदेला 8 लाखांचा दंड 

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंडला वारंवार लागणार्‍या आगीमुळे त्या भागात प्रचंड वायू प्रदूषण होत आहे. याबाबत उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेवर 8 लाखाची दंडात्मक कारवाई केली आहे. वर्ष झाले तरी पालिकेने अद्याप हा दंड भरलेले नाही. प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्याने नाही. त्यामुळे पुन्हा मोठ्या दंडासह पुढील कठोर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोल्हापूर कार्यालयाला पाठविण्याची तयारी केली आहे.

रत्नागिरी पालिकेच्या शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी प्राणघातक खेळ सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पमध्येच डंपिंग ग्राउंड आहे. ते गलिच्छ बनले आहे. त्यातून कावळे व घारी मेलेल्या कोंबड्यांचे व टाकलेल्या मटणाचे अवशेष उचलून जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पाण्याच्या टाकीवर बसून खातात. सडलेल्या मांसाचे तुकडे  पाण्याच्या टाकीत पडतात. दांडेआडोम येथील प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाचा निकाल पालिकेच्याबाजून लागला आहे. त्याचा फेर डिपिआर बनविण्यात येत आहे. कचर्‍याला वारंवार आग लावून प्रचंड प्रमाणात धूर पसरून वायू प्रदूषण होते. आजूबाजूच्या लोकांना श्‍वसनाचे विकार होत आहेत. या तक्रारींनंतर प्रदूषण मंडळाने प्रत्येक्षा पाहणी केली तेव्हा प्रचंड प्रदूषण होत असल्याचे दिसून आले. वर्षभरापूर्वी यासाठीच प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेवर 8 लाखाची दंडात्मक कारवाई केली. परंतु अजून दंडाची रक्कम पालिकेने भरलेली नाही. साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंड आणि प्रदूषणाची परिस्थितीत जैसे   थे आहे. पालिकेकडून प्रदूषण मंडळाच्या नोटीसीलाच केराची टोपली दाखवली जात आहे. पालिका या प्रदूषणाबाबत गंभीर नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळ आता गंभीर झाले आहे. पालिकेला पुन्हा मोठा दंड करून त्यापुढील कठोर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल येथील कार्यालयाने कोल्हापूर येथील मुख्य कार्यालयाला देण्याची तयारी दर्शविली आहे. येथील अधिकार्‍यांनी त्याला दुजोरा दिला.