पोलीस दलात 130 मध्ये केवळ 19 स्थानिक मुलांची निवड

रत्नागिरी:- सरकारी कर्मचारी भरती मध्ये केवळ पोलीस दलातच सर्वाधिक जागा असतात. बारावी पास झालेल्या मुलांना नोकरीची संधी असते . मात्र रत्नागिरीत झालेल्या पोलीस भरतीला 7 हजारांहून अधिक उमेदवारांनी हजेरी लावली होती. या पोलीस भरतीमध्ये स्थानिकांच्या पदरी मात्र निराशा आली आहे. पोलीस भरतीत अंतिम 130 पैकी रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त 19 जणांची निवड झाली आहे. स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रश्नपत्रिका असतानाही मुलांना त्याची उत्तरे देता आली नाहीत.

जानेवारी महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पोलीस भरती झाली. 130 जागांसाठी ही पोलीस भरती घेण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शारीरिक चाचणीसाठी सुमारे 7 हजार उमेदवारांनी अर्ज भरले होते. शारिरीक चाचणीमध्ये सुमारे साडेचार हजार उमेदवार उत्तीर्ण झाले होते. एप्रिल रोजी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा झाली. त्या परीक्षेनंतर अंतिम 130 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्या 130 उमेदवारामध्ये रत्नागिरीतील स्थानिक 19 उमेदवारांची निवड झाली आहे. गेली अनेक वर्षे अनेक विभागात नोकर भरती नसल्यामुळे अनेक उच्चशिक्षीत तरुणांनी पोलीस भरतीकडे आशेने पाहिले होते. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली आहे.