खेड:- गेले दीड वर्षे कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता निसर्गानेही चांगलाच फटका दिला आहे. कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामळे जगबुडी आणि नारिंगी नदीला आलेल्या महापुरात खेडची बाजारपेठ कित्येक तास पाण्याखाली राहिल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी पहाटेपासून शहरात भरलेले पाणी ओसरायला सुरवात झाली आणि हळुहळ बाजारपेठेचे भयान रुप स्पष्ट होवू लागले. आता बाजापेठेतील रस्ते पुराच्या वेढ्यातून मुक्त झाले असले तरी रस्त्यावरचिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
बुधवारी रात्रीपासून कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील प्रमुखनद्या धोक्याची पातळी ओलांडून वहात आहेत. चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी आणि शिवतर खेड तालुक्यातील जगबुडी आणि नारिंगी या नद्यांच्या पाण्याची पातळी कित्येक पटीनेवाढली आहे. जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांचे पाणी बुधवारी मध्यरात्रीपासून बाजारपेठेत शिरू लागल्याने खेडची बाजारपेठ पाण्याखाली गेली. बाजारपेठेत पाणी भरत असल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलविण्याचा प्रयत्न केला मात्रबघता बघता बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने व्यापाऱ्यांना दुकानातील माल सुरक्षितस्थळीहलविणे शक्य झाले नाही. गुरुवारी दिवसभर खेड शहरातील सफा मस्जिद, साठे मोहल्ला, वालकी गल्ली, पोत्रिक मोहल्ला, पानगल्ली, गुजरआळी या नागरी वस्ती असलेल्या भागांसह मुख्य बाजारपेठ, गांधीचौक, हुतात्मा कान्हेरे चौक, हनुमानपेठ, तळ्याचे वाकण या भागात अंदाजे दहा ते १२ फुट इतके पाणी होते. पुरामुळे नागरी वस्तीत अडकुन पडलेल्या नागरिकांना फायबर बोटींच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. शुक्रवारी रात्री पावसाचा जोर थोडा कमी झाल्यावर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास शहरात भरलेले पुराचे पाणी हळुहळु ओसरू लागले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खेडची बाजारपेठ पुराच्या वेढ्यातून मुक्त झाली मात्र संपुर्ण शहरात चिखलाचे साम्राज्य पसरले.दुकानांमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे दुकानातील मालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरात ठिकठिकाणी पार्क केलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम व त्यांचे सहकारी आज सकाळी सहा वाजल्यापासून खेड शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी ठाण मांडून असून पुरामध्ये अडकलेल्या नागरिंना अन्नाची पाकीट, पाण्याच्या बाटल्या, वैद्यकिय मदत पुरविण्यात आली आहेत.
खेड शहरातील रस्त्यावरील चिखल साफ करण्यासाठी कदम यांनी दोन जेसीबी, चार टॅक्टर, एक पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला आहे. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी देखील नगरपालिका कर्मचाऱ्यांसह मदत कार्यास सुरवात केली आहे. खेड नगरपालिकाअग्नीशमन बंबाच्या सहाय्याने शहरातील रस्त्यांची साफसफाई सुरु करण्यात आली आहे. खेडचे प्रातांधिकारी अविशकुमार सोनोने, उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशिद, तहसिलदार प्राजक्ता घोरपडे, पोलीस निरिक्षक निशा जाधव आदी प्रशासकिय अधिकाऱ्यांनी संपुर्ण बाजारपेठ परिसराची पाहणी करून व्यापाऱ्यांना धीर दिला.