पीरलोटेनजीक ट्रक- टँकर अपघातात टँकरचालक ठार

खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील पीरलोटेनजीक ट्रक व टँकर यांच्यात झालेल्या अपघातात टँकरचालक ठार झाला. मल्लाप्पा भिमशा बगळे (44, रा. हातुरे-सोलापूर) असे मृत्यू झालेल्या टँकर चालकाचे नाव आहे. यामध्ये ट्रकालकही जखमी झाला. अपघातप्रकरणी मृत टँकरचालकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील ट्रकचालक संजय आनंदा पाटील (37, रा. वेळाणे- कोल्हापूर) हे आपल्या ताब्यातील ट्रक (एम.एच.09/ई.एल. 7295) घेवून मलकापूर येथून माणगाव येथे जात होते. यावेळी टँकरचालक मल्लाप्पा बगळे हा आपल्या ताब्यातील टँकर (एम.एच.13/डी.क्यू 4562) घेवून खेडहून चिपळूणच्या दिशेने जात होता. यावेळी टँकरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने ट्रकला धडक दिली.

ट्रकचालक संजय पाटील हे देखील जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवल्यानंतर विस्कळीत वाहतूक पूर्ववत झाली. दोन्ही वाहनांचया नुकसानीसह ट्रक चालकाच्या दुखापतीस व स्वतः च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.