पावसमध्ये सख्या भावांमध्ये तुंबळ हाणामारी; नऊजण जखमी, परस्पर विरोधी तक्रारी दाखल 

रत्नागिरी:- तालुक्यातील पावस नालेवठार येथे जमीन वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये नऊ जण जखमी झाले असून ११ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवार 3 जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याचे सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णकांत अशोक भातडे (३३ पावस, नालेवठार ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सामायिक घरातील खोलीला कोणाचीही परवानगी न घेता हेमंत भातडे, शंकर भातडे, दिशा भातडे, दिनेश भातडे, लीना उपटे या 5 जणांनी वेगळा दरवाजा पाडण्यास सुरुवात केली. यावेळी कृष्णकांत भातडे यांनी त्यास काम करू नका असे सांगितल्याने राग मनात धरून 5 जणांनी त्यांना शिवीगाळ करत लाकडी बांबू व चिरे खाणीच्या लोखंडी फरशीने डोक्यात मारहाण करून जखमी केले. या मारहाणीत गौरव महादेव भातडे, अभिजीत अशोक भातडे, माधवी महादेव भातडे, कृष्णकांत अशोक भातडे, महादेव यशवंत भातडे असे 5 जण जखमी झाले. याबाबतची फिर्याद कृष्णकांत भाताडे यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर हेमंत भातडे, शंकर भातडे, दिशा भातडे, दिनेश भातडे, लीना उपटे अशा पाच जणांवर भादवी कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुसऱ्या बाजूने दिशा दिनेश भातडे (33 सीतपवाडी, नाले वठार) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिर राहत असलेल्या खोलीला स्वतंत्र दरवाजा पाडण्याचे काम चालू होते. या ठिकाणी येऊन अभिजीत अशोक भातडे, कृष्णकांत अशोक भातडे, गौरव महादेव भातडे, महादेव यशवंत भातडे, सुरेखा भातडे, अशोक भातडे यांनी तेथे येऊन काम करण्यास विरोध केला. फिर्यादी दिशा भातडे यांचे पती दिनेश भातडे, व दिर हेमंत भातडे यांना काठीने व दांडक्याने डाव्या हातावर व पाठीवर मारहाण केली. तसेच सासरे यांच्या डोक्यात दांडक्याने मारहाण केली शिवाय पतीच्या गळ्यातील सोन्याची चेन तुटून नुकसान केले. या मारहाणीत हेमंत भातडे, शंकर भातडे, दिनेश भातडे, लीना कुपटे असे 4 जण जखमी झाले. असे तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार अभिजीत अशोक भातडे, कृष्णकांत अशोक भातडे, गौरव महादेव भातडे, महादेव यशवंत भातडे, सुरेखा भातडे, अशोक भातडे अशा सहा जणांवर 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.