पालकांवर संमतीपत्रासाठी सक्ती नको : जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- शाळा सुरु करत असताना पालकांवर संमतीपत्रासाठी सक्ती करु नका. जिथे ऑनलाईन शाळा शिकवणे शक्य आहे, तिथे त्याचा उपयोग करावा. ग्रामीण भागात रेंज नाही, तिथे शिक्षकांनी प्रत्यक्ष जाऊन शिकवावे, अशा सुचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सायंकाळी झालेल्या बैठकीत दिले; मात्र शाळा सुरु ठेवण्यात येतील असे जिल्हा प्रशासनकडून स्पष्ट करण्यात आले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (ता. 23) झालेल्या पत्रकार परिषदेत शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने विचार करावा असे स्पष्ट केले होेते; मात्र मंगळवारी (ता. 24) जिल्हाधिकार्‍यांनी सायंकाळी उशिरा आढावा घेतला. यावेळी तहसिलदार, गट विकास अधिकारी यांच्यासह  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती घाणेकर, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर उपस्थित होते. जिल्ह्यात माध्यमिक शाळा सुरु झाल्या असून दुसर्‍या दिवशी 39 शाळांची भर पडली. एकुण 243 शाळा सुरु झाल्या आहेत. आतापर्यंत 4,443 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी झाली. त्यातील 12 जणं कोरोना बाधित आहेत. पहिल्या पावणे आठ हजार विद्यार्थी हजर होते. दुसर्‍या दिवशी हा आकडा 13 हजार 823 समंतीपत्रापर्यंत एका दिवसात पाच हजार संमतीपत्रे वाढली आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शाळा सुरु करण्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी अडचणी जाणून घेतानाच पुढे काय करायचे याबाबत सुचना दिल्या आहेत. कोरोना भितीमुळे अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे. आतापर्यंत 15 टक्केच विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अजूनही शाळेत गेलेले नाहीत. ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी शाळेने घ्यावयाची आहे. विद्यार्थी राहत असलेल्या ठिकाणी शिक्षकांनी जाऊन अभ्यासक्रम शिकवावा अशा सुचना जिल्हाधिकार्‍यांनी केल्या आहेत.