रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नवीन चारही सिग्नल यंत्रणांपैकी चालू आठवड्यात जेल नाका येथीलच सिग्नल सुरू होवू शकणार आहेत. या ठिकाणी असलेल्या सिग्नलच्या टायमिंगची चाचणी नुकतीच झाली आहे. येथील रस्त्यावर पादचार्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग आणि वाहनधारकांना सिग्नलवर कुठे थांबायचे हे दर्शवणारी स्टॉप लाईन रंगवण्याचे काम या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर येथील सिग्नल सुरू होणार आहेत.
रत्नागिरी शहरात राम नाका, जेल नाका, जयस्तंभ, मारूती मंदिर या चार ठिकाणी नवीन सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. जेल नाका येथीलच सिग्नल संदर्भातील विविध चाचण्या झाल्या आहेत. वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत जेल नाक्यावरील सिग्नलचा डेमो पार पडला. यावेळी सिग्नलचे टायमिंग व्यवस्थित आहेत की नाही याची चाचणी घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मारूती मंदिरच्या दिशेने जाणार्या वाहनांसाठी आणि मारूती मंदिरकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार्या वाहनांसाठी 30 सेकंदाचे टायमिंग ठेवण्यात आले
आहे.
गोगटे कॉलेजकडून येणार्यावाहतुकीचे नियोजन करणार्या सिग्नलवरचे टायमिंग 20 सेकंदाचे तर पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून येणार्या वाहनांसाठी 15 सेकंदाचे टायमिंग ठेवण्यात आले आहे. जेल नाक्यावरील सिग्नल यंत्रणेचा डेमो वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत पूर्ण झाला आहे. हे काम चालू आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर लगेचच जेल नाक्यावरील सिग्नल सुरू होणार आहेत. मारूती मंदिर, जयस्तंभ, राम नाका येथील सिग्नलचे डेमो अद्याप झालेले नाहीत. त्यामुळे या तीन ठिकाणचे सिग्नल चालू आठवड्यात सुरू होण्यास वेळ लागू शकणार आहे.