परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत सुरू

चिपळूण:-मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक महिनाभर दिवसातून ५ तास बंद ठेवली होती. मात्र, गुरुवारपासून पूर्णवेळ नियमित वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, एकाबाजूला डोंगर कटाईसह चौपदरीकरणाचे कामही सुरू ठेवण्यात आले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे काम सुरू ठेवले जाणार असून, घाटात महिनाभर असलेला पोलीस बंदोबस्तही हटविण्यात आला आहे.

परशुराम घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळावी, यासाठी २५ एप्रिलपासून दुपारी १२ ते सायंकाळी ६ या दरम्यान ५ तास वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. या कालावधीत पूर्ण क्षमतेने चौपदरीकरणाचे काम सुरू होते. त्यातून बहुतांशी ठिकाणी डोंगर कटाईचे काम पूर्णत्वाला गेले आहे. ईगल कंपनीने डोंगर कटाई सुरू ठेवलेली असतानाच ७०० मीटरपर्यंतचे रस्ता काँक्रिटीकरणही पूर्ण केले आहे.

याचपद्धतीने खेड हद्दीत कल्याण टोलवेज कंपनीचे अवघड टप्प्यात काम सुरू आहे. त्यासाठी बेंचिंग पद्धतीने डोंगर कटाई केली असून, दरडी कोसळण्याचा धोका कमी केला आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात वाहतूक सुरू असताना उर्वरीत डोंगर कटाईचे काम सुरू ठेवले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे काम नियमितपणे सुरू ठेवले जाणार आहे.

घाट बंद असताना महामार्गावरील वाहतूक कळबंस्ते ते चिरणीमार्गे वळविण्यात आली होती परंतु, यामार्गे मोठा वळसा घेऊन जावा लागत असल्याने वाहतूकदार हैराण झाले होते तसेच कळंबस्ते येथील रेल्वे ट्रॅक, आंबडस (खेड) येथील अरूंद व धोकादायक पूल, खचलेल्या साईड पट्ट्यामुळे या मार्ग धोकादायक होता. त्यामुळे घाट सुरू होण्याबाबत एस. टी. महामंडळासह लोटेतील कामगारांनाही उत्सुकता होती. अखेर जिल्हाधिकारी यांनी २५ मे रोजी घाट नियमितपणे सुरू ठेवण्याचे संकेत देताच दोन्ही बाजूला ठेवलेला पोलीस बंदोबस्त गुरुवारपासून हटविण्यात आला.