ना. उदय सामंत; पावसाळ्यातील भूस्खलन रोखण्यासाठी गतीने काम
रत्नागिरी:- पावसाळ्यात भूस्खलन होऊन परशुराम घाटाला धोका निर्माण झाला तर मुंबई-गोवा महामार्ग बंद पडण्याची भिती आहे. परशुराम घाटात भूस्खलन होऊ नये व रुंदीकरण गतीने व्हावे, यासाठी २० एप्रिलपासून दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घाटातील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. भर उन्हात हे काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी पाहणी करून १९ एप्रिलला अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत आज तातडीची आढावा बैठक झाली. त्यानंतर आयोजित झूम पत्रकार परिषदेत ते ते म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गावरील हा घाट आहे. यापूर्वी घाटात दरड कोसळून अनेकवेळा वाहतूक ठप्प झाली आहे. घाटाच्या दुरुस्तीचे काम करताना अपघातही झाला आहे. त्यामध्ये काहींना जीव गमवावे लागले होते. घाटामध्ये अजूनही सुमारे १ लाख ६० हजार क्युबिक माती काढण्याची गरज आहे. मार्गावरील वाहतूक सुरू राहिल्यामुळे कामाला अपेक्षित गती मिळत नाही. त्यात पावसाळा जवळ आल्याने हे काम वेगाने करण्याची गरज आहे. सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे, बागायतदार आणि उद्योजकांना या कालावधीत वाहतूक बंद करणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे जिल्हाधिकारी या घाटाची आणि पर्यायी मार्गाची पाहणी करून १९ तारखेला याबाबत अंतिम निर्णय होईल; मात्र दुपारी १२ ते सायंकाळी ५ या कालावधीत अवजड वाहतूक बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असून त्यासाठी भर उन्हाची वेळ निवडण्यात आली आहे. साधारणपणे या वेळेत आंबा वाहतूक किंवा मोठी वाहतूक होत नाही, म्हणून असे नियोजन करण्याचे ठरले आहे. घाटातील काम गतिमान पद्धतीने व्हावे, यासाठी येथे उत्खनन करणाऱ्या यंत्रांची संख्या वाढवण्याचे आदेशही दिले आहेत. साधारण १ महिना हे काम चालण्याची शक्यता आहे.
सुरक्षेच्यादृष्टीने चार पोलिस चौक्या
कळंबस्तेमार्ग पर्यायी मार्ग काढण्यात येणार आहे. त्याची सार्वजनिक विभागाकडून पाहणी केली जाईल. तसेच सुरक्षेच्यादृष्टीने चार पोलिस चौक्या तेथे सुरू करून वाहतूक सुरळीत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग तसेच परिवहन व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
काळबादेवीसाठी धूपप्रतिबंधक बंधारा
पावसाळ्यात समुद्राच्या उधाणामुळे तालुक्यातील काळबादेवी किनाऱ्याची मोठी धूप होते. त्यामुळे तेथे मानवी वस्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यासाठी गेली काही वर्षे काळबादेवीच्या संरक्षणासाठी धूपप्रतिबंधक बंधारा व्हावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार काळबादेवीला १ किमीचा धूपप्रतिबंधक बंधारा मंजूर झाला आहे. सुमारे साडेसात कोटीचा हा बंधारा असून, आज मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात आले.