रत्नागिरी:- मुसळधार पावसात परशुराम घाटात मंगळवारी पुन्हा दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. या भागात पाऊस सुरू असून घाटात दरड कोसळण्याची शक्यता अधिक आहे. जिल्ह्यात 9 जुलै पर्यंत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला असून या घाटात दरड कोसळून जीवित हानी घडू नये यासाठी 9 जुलै पर्यंत परशुराम घाटातील वाहतूक चिरणी-आंबडस-चिपळूण या पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मुसळधार पावसात 2 जुलै रोजी परशुराम घाटामध्ये दरड आल्यामुळे घाट रस्ता बंद झालेला होता. मध्यरात्री साडेतीन वाजता दरड बाजुला करुन वाहतुक सुरु करण्यात आली होती. पुन्हा 5 जुलै रोजी मोठ्या प्रमाणात परशुराम घाटामध्ये दरड खाली येवून पूर्णपणे वाहतुक बंद झाली. जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असून घाटामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक दरडी केव्हाही खाली येण्याची शक्यता मोठया प्रमाणात आहे.
हवामान विभागाने 9 जुलैपर्यंत हवामान खात्याकडून जिल्हयासाठी रेड अलर्ट जाहिर करण्यात आला आहे. अतिवृष्टीत दरडी कोसळून जिवीत हानी होवू नये यासाठी 9 जुलै पर्यंत परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंद करण्यात यावा असा अहवाल कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण व रत्नागिरी यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांजकडे सादर केलेला आहे.
उपविभागीय दंडाधिकारी चिपळूण प्रविण पवार यांनी 6 जुलै सायंकाळी चार वाजलेपासून 9 जुलै रात्री बारा वाजेपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे असे आदेशित केले आहे.
9 जुलै 2022 रोजी परशुराम घाटाची परिस्थिती पाहून व अतिवृष्टी यांचा विचार करुन कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण व रत्नागिरी यांचे फेर अभिप्राय घेवून पुढील निर्णय घेण्यात येईल. तथापि, बंदी कालावधीत केवळ कमी वजनाची (Light Vehicle) वाहतूक ही चिरणी-आंबडस-चिपळूण या पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी असे आदेशात नमूद केले आहे.