रत्नागिरी:- घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवारी जिल्ह्यात पावसाचेही घट बसले. परतीच्या पावसाने उत्तर रत्नागिरीत धुमाकुळ घातला असून तर दक्षिणेकडील तालुक्यात थांबूनथांबून सरी पडत आहेत. आज मंदिराचे दरवाजे उघडले असले तरीही पावसामुळे दर्शनासाठी तुरळक गर्दी होती. गणपतीपुळेत दिवसभरात आठशे भक्तांनी हजेरी लावली. पावसाचा फटका भातशेतीला बसला असून हळव्या भाताचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पुढील दोन दिवस पावसाचा जोर राहिल असे हवामान विभागाकडून सुचविण्यात आले आहे. गुरुवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. खेड, चिपळूणात मुसळधार पाऊस सुरु झाला. सायंकाळपर्यंत जोर कायम होता. दापोली, खेड, मंडणगडात तशीच परिस्थिती होती. संगमेश्वरात काही भागांमध्ये पावसाचा जोर होता, पण रत्नागिरी, लांजा, राजापूरात दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. पावसामुळे भात कापणी थांबली आहे. भात कापून ठेवणार्यांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी १३.११ मिमी पाऊस झाला. त्यात मंडागड ७.७०, दापोली ११, खेड २२.६०, गुहागर १०.६०, चिपळूण ३५.५०, संंगमेश्वर ७.८०, रत्नागिरी १०, लांजा ९.९०, राजापूरात २.९० मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३९२९ मिमी पाऊस झाला आहे.
घटनास्थापनेच्या दिवशीच पाऊस सुरु झाल्यामुळे नवरात्रोत्सव साजरे करणार्यांची तारांबळ उडाली होती. पावसाने उघडिप दिल्यामुळे प्रतिष्ठापना झाली, पण दुपारनंतर दर्शनासाठी येणार्यांची पंचाईत झाली होती. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली झाली, पण शाळा सुरु असल्याने पहिल्या दिवशी दर्शनासाठी येणार्यांचा प्रतिसाद कमी होता. आडीवरचे महाकाली, रत्नागिरीतील भगवती, तुरंभवची देवी, रामवरदायीनी, दापोलीतील चंडिकादेवी मंदिरात दर्शनासाठी स्थानिकांनी हजेरी लावली होती. श्री क्षेत्र गणपतीपुळेत मोठ्याप्रमाणात दर्शनासाठी गर्दी होईल अशी अपेक्षा होती; परंतु सकाळी सात वाजल्यापासून दिवसभरात आठशे जणांनी दर्शन घेतल्याची नोंद झाली. त्यात स्थानिकांचाही समावेश होता. मंदिरे उघडल्यामुळे गणपतीपुळे किनार्यावरील व्यावसायिकांना मोठी गर्दी अपेक्षित होती. पण त्यांची निराशाच झाली. दुपारनंतर किनार्यावर तुरळक लोकांची ये-जा सुरु होती. पुन्हा सायंकाळी पर्यटक आले. अपेक्षित असा व्यावसाय झाला नाही. दरम्यान, कोरोनाचे निकष पाळून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. सोशल डिस्टन्सिंग आणि मुखपट्टी (मास्क) यासाठी मंदिर परिसरात सक्ती केली जात होती. सुरक्षा रक्षकांमार्फत त्यावर लक्ष ठेवण्यात येत होते.