नुकसान 36 कोटी मिळाले अवघे 1 कोटी 27 लाख

निसर्ग वादळ भरपाई; निधीची प्रतिक्षाच  

रत्नागिरी:- निसर्ग वादळात जिल्हा परिषद मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यासाठी सुमारे 36 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. त्यातील प्राथमिक शाळांसाठी 1 कोटी 27 लाख रुपये प्राप्त झाले असून उर्वरित कामांसाठी निधीची प्रतीक्षाच आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात निसर्ग वादळाने धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये कोट्यवधीचे नुकसान झाले असून जिल्हा परिषद मालमत्ताही उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. दापोली, मंडणगड तालुक्यातील नुकसान झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीसाठी निधीची मागणी केली आहे. कशेळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारती दुरुस्त जिल्हा परिषद सेसमधून करण्यात आली. त्यावर 55 लाख 679 रुपये खर्च आला. रस्ते, साकव, इमारत दुरुस्तीसाठी 54 लाखाची मागणी शासनाकडे केली आहे. मंडणगड येथील कृषी विभागाच्या गोडाउनचे 35 हजाराचे नुकसान झाले आहे. स्मशानशेड, समाजमंदिर, ग्रामपंचायती इमारती यांचे नुकसानीपोटी 8 कोटी 58 लाखाचे नुकसान झाले असून त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

मंडणगड, खेड व दापोली या तीन तालुक्याव्यतिरिक्त अन्य सहा तालुक्यांनाही या चक्रीवादाळाचा तडाखा बसला. या सहा तालुक्यांमधील जिल्हा परिषद मालमत्तांचे 18 कोटी 23 लाख 50 हजाराचे नुकसान झाले. त्यासाठी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सर्वाधिक फटका जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना बसला आहे. 475 शाळांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईसाठी 8 कोटी 62 लाख 79 हजार रुपये अनुदानाची एकत्रित मागणी केली होती. त्यापैकी 251 शाळांसाठी 1 कोटी 27 लाख 17 हजार अनुदान प्राप्त झाले आहे. त्यापैकी 154 शाळांना अनुदान वाटप झालेले आहे. तातडीच्या शाळा दुरुस्तीच्या 16 कामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. आरोग्य विभागाच्या नुकसानीची माहिती ज्या तालुक्यामधून प्राप्त झाली आहे, ती आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. ग्रामपंचायत इमारती, स्मशानशेड, समाजमंदिर आदींसाठी नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. तथापि अद्याप नुकसान भरपाई शासनाकडून प्राप्त झालेली नाही.