नव्या मत्स्य हंगामावर कोरोनाचे सावट 

तीस टक्केच मच्छीमार सज्ज, खलाशांची समस्या

रत्नागिरी:- कोविड 19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका यंदाच्या मच्छीमारी हंगामच्या पहिल्या दिवसांपासून मच्छीमारांपुढे आहे. 1 ऑगस्टला मासेमारी सुरु करण्यात अनिश्‍चितता आहे. परराज्यातून येणार्‍या खलाशांची उपलब्धतता, व्यावसायासाठी आर्थिक चणचण, डिझेल परतावा रखडल्याने कर्जाचे थकलेले हप्ते या परिस्थितीत व्यावसाय सुरु करण्याची मानसिकता मच्छीमारांमध्ये नाही. तरीही स्थानिक खलाशांच्या साह्याने वातावरणाचा अंदाज घेत 30 टक्केच मच्छीमार समुद्रात जाऊ शकणार आहेत.

गतवर्षी मासेमारी हंगामात एका पाठोपाठ आलेली वादळे, कोरोना महामारीमुळे झालेले लॉकडाऊन यामुळे संपूर्ण मत्स्य व्यवसाय कोलमडला. मच्छिमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दरवर्षी नारळीपौर्णीमेनंतरचा मासेमारी हंगाम मच्छीमारांना दोन पैसे मिळवून देतो; परंतु यंदा मासेमारीवर कोरोनाचेच सावट आहे. ट्रॉलर, गिलनेट, डोलनेट व इतर लहान-मोठ्या बोटींद्वारे मासेमारी सुरु होईल. जिल्ह्यात कर्नाटक, नेपाळ, केरळ येथून खलाशी आणले जातात. लॉकडाऊनमुळे त्यांना आणण्यात अनंत अडचणी आहेत. मोजक्याच मच्छीमारांनी खलाशी आणून त्यांना क्वारंटाईन केले होते. त्यामुळे 1 ऑगस्टपासून समुद्रात जाण्यासाठी 30 टक्केच नौका सज्ज आहेत. वातावरण स्थिरावले तर त्यांना समुद्रात जाण्यास संधी मिळू शकते. उर्वरित मासेमारी नारळीपौर्णिमेनंतरच सुरु होईल. केंद्रशासनाकडून आत्मनिर्भर होण्यासाठी नाबार्डच्या सुचनेनुसार कर्ज घेतलेल्या मच्छीमारांना एक लाख 60 हजार रुपये खेळत भांडवले उपलब्ध करुन देण्याचे आदेश होते; परंतु त्यांची अंमलबजावणीत अडथळे आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनासह सहाय्यक मत्स्य अधिकार्‍यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. परिणामी मच्छीमारांना नव्याने व्यावसाय सुरु करण्यासाठी भांडवलाची गरज भासत आहे.